आदिवासींनी सर्वप्रकारचे आक्रमण परतावून लावावे
By Admin | Updated: January 17, 2016 01:16 IST2016-01-17T01:16:34+5:302016-01-17T01:16:34+5:30
अलीकडे आदिवासींवर सामाजिक व सांस्कृतिक आक्रमण होत असून, राजकीय व्यवस्थाही त्याला न्याय देण्यात अपयशी ठरत आहे.

आदिवासींनी सर्वप्रकारचे आक्रमण परतावून लावावे
चर्चासत्राचा समारोप : विविध विषयांवर परिसंवादात विचारमंथन
गडचिरोली : अलीकडे आदिवासींवर सामाजिक व सांस्कृतिक आक्रमण होत असून, राजकीय व्यवस्थाही त्याला न्याय देण्यात अपयशी ठरत आहे. अशावेळी आदिवासींनी संघटित होऊन सर्वप्रकारचे आक्रमण परतावून लावावे, असा सूर ‘आदिवासींची स्थिती व आव्हाने’ या विषयावर आयोजित विविध चर्चासत्रांतील मान्यवरांनी दुसऱ्या दिवशी शनिवारी काढला.
माजी आमदार दिवंगत नेताजी राजगडकर यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी सोशल फोरम व अखिल भारतीय आदिवासी महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडवन कला दालनात दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी पहिल्या सत्रात ‘आदिवासी-सांस्कृतिक-धार्मिक आक्रमणाचा धोका’ या विषयावर नागेश चौधरी म्हणाले, हिंदुराष्ट्राचे पुरस्कर्ते नियोजनबद्धरित्या आदिवासींवर सांस्कृतिक आक्रमण करीत आहेत. आदिवासींना वनवासी बनविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. समरसतेच्या माध्यमातून त्यांना विषमताच पेरायची असून, समरसता व समता यांच्यात फरक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समतेचं राष्ट्र निर्माण करण्यासाठी आदिवासी, दलित व ओबीसींनी एकत्रितरित्या हिंदूराष्ट्रनिर्मितीचे प्रयत्न हाणून पाडावे, असे आवाहनही नागेश चौधरी यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात हिरालाल येरमे म्हणाले, एकीकडे संस्कृत विद्यापीेठे निर्माण केली जातात, मग गोंडी विद्यापीठ का निर्माण केले जात नाही, असा सवालही हिरालाल येरमे यांनी उपस्थित केला. दुसऱ्या सत्रात ‘आदिवासी साहित्य:वाटचाल आणि आव्हाने’ या विषयावर राजेश मडावी म्हणाले, प्रस्थापित साहित्यामुळे सुशिक्षित आदिवासींचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे हा समाज आदिवासी साहित्याकडे मोठया आशेने बघायला लागला आहे. निव्वळ कलावादी साहित्याला अर्थ नसून, त्याला वैचारिक अधिष्ठान असणे गरजेचे आहे, असेही मडावी यांनी स्पष्ट केले.
डॉ.अशोक पळवेकर म्हणाले की, समाज, साहित्य, तत्वज्ञान वेगवेगळे करुन कुठल्याही समूहाच्या जीवनाचा साकल्याने अभ्यास करता येत नाही. तत्वज्ञानाचा गाभा समुहापर्यंत पोहचविण्यासाठी ते लालित्याच्या अंगानेच पोहचवावे लागते. कार्यकर्ता हा प्रथम तत्वाज्ञानाशी जुळतो. त्यामुळे कार्यकर्ता हाच साहित्याचा प्रचारक असतो, असेही ते यावेळी म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)