आदिवासी विद्यार्थ्यांची होणार विमानवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:03 IST2018-12-16T23:58:13+5:302018-12-17T00:03:41+5:30

गडचिरोली, अहेरी व भामरागड या तीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या ४४ आदिवासी विद्यार्थ्यांची भारत भ्रमणासाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना विमान प्रवासाचा आनंद उपभोगता येणार आहे.

Tribal students to take flight | आदिवासी विद्यार्थ्यांची होणार विमानवारी

आदिवासी विद्यार्थ्यांची होणार विमानवारी

ठळक मुद्देप्रकल्प कार्यालयाचा पुढाकार : दिल्ली व आग्रा येथील स्थळांना भेटी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली, अहेरी व भामरागड या तीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या ४४ आदिवासी विद्यार्थ्यांची भारत भ्रमणासाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना विमान प्रवासाचा आनंद उपभोगता येणार आहे. २० डिसेंबर रोजी सदर विद्यार्थी गडचिरोली येथून प्रस्थान होणार आहेत.
आदिवासी विद्यार्थ्यांना भारताने केलेली प्रगती बघता यावी. त्यांच्यात सकारात्मक बदल घडून यावे. नवीन तंत्रज्ञान जाणता यावे, या उद्देशाने आदिवासी विकास विभागाने यावर्षी नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत ४४ विद्यार्थ्यांना भारत भ्रमणासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांमध्ये गडचिरोली प्रकल्पातील २४, अहेरी प्रकल्पातील १२ व भामरागड प्रकल्पातील ८ अशा एकूण ४४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी ३० सप्टेंबर रोजी तिन्ही प्रकल्पात परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत संबंधित आश्रमशाळेतून सर्वाधिक गुण प्राप्त करणाºया एका विद्यार्थ्याची भारत भ्रमणासाठी निवड करण्यात आली आहे. सदर विद्यार्थी भारत भ्रमणासाठी गडचिरोली येथून २० डिसेंबर रोजी रवाना होणार आहेत. यानिमित्त दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम आयोजित केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम विद्यार्थ्यांच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखविणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, नगराध्यक्ष योगीता पिपरे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना प्रथमच भारत भ्रमणाची संधी उपलब्ध होणार आहे. २१ डिसेंबरला हे विद्यार्थी नागपूर येथून दिल्लीसाठी विमानाने प्रस्थान करणार आहेत. सात दिवसांच्या या भारत भ्रमण सहलीसाठी विद्यार्थ्यांसोबत गडचिरोलीच्या सहायक प्रकल्प अधिकारी वंदना महल्ले, अहेरीचे सहायक प्रकल्प अधिकारी प्रकाश जामठे, राजीव बोंगीरवार राहणार आहेत.
या ठिकाणांना ४४ विद्यार्थी देणार भेट
सदर विद्यार्थी दिल्ली येथील कुतूबमिनार, लोटस टेम्पल, लाल किल्ला, राष्ट्रपती भवन, संसद भवन, राजघाट, स्पोर्ट अ‍ॅथोरिटी आॅफ इंडिया, जवाहरलाल नेहरू स्टेडीयम, इंदिरा गांधी स्टेडीयम, आग्रा येथील ताजमहल, आग्रा किल्ला, फत्तेपूर सिकरी तसेच जयपूर येथील प्रेक्षनिय स्थळांना भेटी देणार आहेत. हे विद्यार्थी राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री, आदिवासी विकास मंत्री यांचीही भेट घेणार आहेत.

Web Title: Tribal students to take flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.