सट्ट्याच्या नंबरात करोडोंचा व्यवहार

By Admin | Updated: April 10, 2015 01:07 IST2015-04-10T01:07:20+5:302015-04-10T01:07:20+5:30

देसाईगंजमध्ये तीन सट्टाकिंगचे अधिराज्य

Treatment of crores in number of stitches | सट्ट्याच्या नंबरात करोडोंचा व्यवहार

सट्ट्याच्या नंबरात करोडोंचा व्यवहार

गडचिरोली : जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी बसलेले सट्टाकिंग गावागावांत आपले एजंट पसरवून दररोज सट्ट्याच्या माध्यमातून करोडो रूपयांचा व्यवहार करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून दिसून आले. या सट्ट्याच्या नादात शाळकरी मुले, महिला यांच्यासह वयोवृध्द नागरिकही गुंतले असल्याचे वास्तव उजेडात आले असून जिल्ह्याच्या मोठ्या शहरासह ग्रामीण भागातही सट्टा व्यवसाय राजरोसपणे चालविला जात आहे. मात्र पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष आहे.
देसाईगंज हे गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी व्यापारी पेठ मात्र येथेही तरूण मंडळी अल्पश्रमात मोठा पैसा कमविण्याच्या नादात सट्टाच्या आहारी गेलेली आहे. तीन सट्टाकिेंग देसाईगंज शहरासह संपूर्ण तालुक्यावर १०० एजंटच्या माध्यमातून आपली पकड ठेवून आहे. दिवसेंदिवस त्यांचा सट्टा व्यवसाय जोमाने सुरू आहे. राजधानी, कुबेर, कल्याण, मधूर असे सट्टे चालविले जाते. शहराच्या ठिकाणी एक रूपयात १०० रूपये तर ग्रामीण भागात सव्वा रूपयात १०० रूपये असा परतावा मिळत आहे. कित्येक कुटुंब या सट्टाच्या आहारी गेलेले आहेत. कमाईच्या ३० टक्के रक्कम सट्टा गमाविली जात आहे, असे चित्र लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनदरम्यान दिसून आले. सट्ट्यात लावलेली रक्कम परत मिळविण्यासाठी वारंवार सट्टा लावून वसूल करण्याच्या उद्देशाने अनेकजण यात ओढल्या गेले आहे. देसाईगंजमधील दोन सट्टाकिंग अतिशय गर्भश्रीमंत झाले आहेत. तर एकाची सुरूवात एजंट म्हणून काम करताना झाली असून आता तो स्वत:च सट्टापट्टी चालवित आहे. दोन्ही सट्टाकिंगांकडे १०० एजंट काम करीत आहे. तर एकाकडे पाच ते सात एजंट आहे. प्रत्येक एजंटाकडून दिवसाला पाच हजाराची सट्टापट्टी कापली जाते.
कागदावरच चालते सारे काम
सट्ट्याचे व्यसन जडलेल्या कित्येक लोकांनी वर्षापासूनचा अंकाचा लेखा-जोखा स्वत:जवळ सांभाळून ठेवला आहे. हा संपूर्ण व्यवसाय कागदाच्या पट्टीवर चालत असतो. त्यामुळे कोणतेही भांडवल न गुंतविता हा व्यवसाय चालवितो येतो. आता काही ठिकाणी मोबाईलचा वापर होऊ लागला आहे.
इतर तालुक्यातील लोकांचीही देसाईगंजवर नजर
देसाईगंज शहरात दिवसाला पाच ते सात लाखांचा सट्टा लावला जातो. सट्ट्यात रक्कम लावल्यानंतर आधी ओपनचा अंक समजतो. रात्री नेटचा अंक येतो. शहरात सट्ट्याचा व्यवसाय इतक्या जोमात आणि नफ्यात सुरू आहे. त्यामुळे इतर तालुक्यातील सट्टा व्यावसायिकांची नजर आता देसाईगंज शहरावर स्थिरावली आहे.
वैरागडात सट्टा लावणाऱ्यांच्या दारात येतोय एजंट
वैरागड येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ बसस्थानकाच्या बाजुच्या पानठेल्यात कुंभार मोहल्ला व इतर दोन ठिकाणी व माळी मोहल्ला अशा पाच ठिकाणी तसेच सुकाळा, मेंढेबोरी या गावांमध्ये सट्टापट्टी जोमात सुरू आहे. वैरागड आणि परिसरात महिला तसेच लहान मुले देखील सट्ट्याच्या नंबरात गुंतले आहे, असे चित्र दिसून येत आहे. वैरागड येथे पाच ठिकाणी पट्टीचे नंबर लावल्या जाते. बहुतेक ठिकाणी वृध्द, लहान मुले आणि घरपोच सट्ट्याच्या नंबराची सेवा देणाऱ्या एजंटांकडून महिला नंबर लावून घेत आहेत. मात्र आरमोरी पोलिसांचे या साऱ्या प्रकाराकडे दुर्लक्ष आहे. वार्डा-वार्डात सट्टापट्टी खुलेआम सुरू असून सोबत दारूविक्रीही जोमाने सुरू आहे. याच पध्दतीने आरमोरी, कुरखेडा येथील सट्टापट्टी चालविली जाते. तीच मंडळी वैरागडात सट्टापट्टी चालवित आहे. शाळकरी, विद्यार्थी, गावातील तरूण सट्टापट्टीच्या नादात लागले आहे.
‘साहेब, येत आहेत’चा मिळाला निरोप!
१५ दिवसांपूर्वी वैरागड येथील पांडव देवाकडे स्वयंपाकासाठी आलेल्या महिलांची काही युवकांनी छेड काढली त्याची पोलिसांत तक्रार केल्यानंतर त्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी आरमोरीचे ठाणेदार महेंद्र मोरे वैरागडला येणार होते. त्या ठिकाणी सट्टापट्टी चालू होती. तेव्हा एका बिट जमादाराचा सट्टापट्टी एजंटला फोन आला. साहेब वैरागडला येत आहेत, पट्टी थोडावेळ बंद ठेवावी.

Web Title: Treatment of crores in number of stitches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.