व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमात खर्रा व्यावसायिक अडचणीचे
By Admin | Updated: August 12, 2016 00:52 IST2016-08-12T00:52:25+5:302016-08-12T00:52:25+5:30
राज्यशासनाने गुटखा व तंबाखुजन्य पदार्थावर बंदी घातली आहे. गडचिरोली जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रशासनाच्या ...

व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमात खर्रा व्यावसायिक अडचणीचे
घोटण्यासाठी मशीनचा आधार : २० रूपयांत एक खर्रा
गडचिरोली : राज्यशासनाने गुटखा व तंबाखुजन्य पदार्थावर बंदी घातली आहे. गडचिरोली जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रशासनाच्या स्तरावरूनही व्यापक प्रयत्न केले जात आहे. मात्र शहरात दररोज लाखो रूपयांचा खर्रा पानठेल्यांवरून विकला जात असल्याने व्यसनमुक्ती कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्यात दोन वर्षापूर्वी गुटख्यासोबतच तंबाखूजन्य पदार्थ व सुगंधीत सुपारी यावर बंदी घालण्यात आली आहे. पानठेल्यांवर आता काही पानठेले वगळता पान कुठेही मिळत नाही. सरसकट सुपारी व तंबाखुजन्य पदार्थाची (खर्राची) विक्री करण्यात येते. साधारणत: आज २० ते २५ रूपयाला तंबाखुजन्य पदार्थाचा खर्रा गडचिरोली जिल्ह्यात विकला जातो. याचे खास शौकिण आहेत. ते एका दिवसाला दोन ते तीन खर्रे सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत खातात, असे जाणकारांचे म्हणणे आहे. एका दिवसात गडचिरोली जिल्ह्यात दोन ते अडीच लाख रूपयाची उलाढाल या व्यवहारात होते. गडचिरोलीत ही बंदी नावालाच उरली असून पोलीस यंत्रणा व अन्न औषध प्रशासन विभाग काहीही कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे. सकाळी मशीनद्वारे हजार ते दीड हजार खर्रे तयार करून त्याच्या पुड्या बांधून थैलीमध्ये शाळकरी मुलांचा वापर करून त्या संबंधिताना पाठविल्या जातात. एका पुडीला किमान २० रूपये किंमत घेण्यात येत आहे. वाटप करणारा हा पोरगा नगदी पैसे घेऊन तासा-दीडतासात सर्व काम फत्ते करतो.
भ्रमणध्वनीवर मागणी नोंदविताच अवघ्या १० ते १५ मिनिटात संबंधितांना खर्रा उपलब्ध होतो. त्यामुळे बंदी नावालाच उरली आहे व शाळकरी मुलांना या कामात ओढून त्यांचेही भविष्य खराब करण्याचे काम सुरू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
एकीकडे जिल्हा प्रशासन तंबाखूमुक्ती कार्यक्रमासाठी बैठकावर बैठका घेत असताना शहरासह ग्रामीण भागातही असे चित्र असल्याने व्यसनमुक्ती कार्यक्रम कागदावरच राहण्याची शक्यता आहे. अनेक शासकीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी कार्यालयातच किंवा कार्यालयाबाहेर तंबाखू, खर्रा सेवन करताना कॉम्प्लेक्स परिसरात दिसून येतात.
शाळांमधून लहान मुलांना याबाबत मार्गदर्शन करण्यात येत असले तरी मोठ्या व ज्येष्ठ लोकांच्या प्रबोधनाची गरज निर्माण झाली आहे. अनेक शाळांच्या परिसरातच १०० मीटरपेक्षा कमी अंतरावर पानठेले खर्रा विक्रीचे काम गडचिरोली शहरात करीत आहे. हे पानठेलेही तेथून हटविण्याची गरज आहे, अशी मागणी व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)