स्थानकासाठी परिवहनमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 22:59 IST2019-01-31T22:58:54+5:302019-01-31T22:59:11+5:30
चामोर्शी येथील बसस्थानकाला जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आ.डॉ.देवराव होळी यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

स्थानकासाठी परिवहनमंत्र्यांना साकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी येथील बसस्थानकाला जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आ.डॉ.देवराव होळी यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
चामोर्शी हे जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर आहे. शेकडो गावे चामोर्शी शहराच्या सभोवताल वसली आहेत. त्यामुळे चामोर्शी येथे बस व प्रवाशांची वर्दळ राहते. मात्र बसस्थानक नसल्याने मुख्य मार्गाच्या बाजूला बसेस उभ्या केल्या जातात. तर प्रवाशांनाही रस्त्यावरच उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे चामोर्शी येथे बसस्थानक होणे आवश्यक आहे. जागेचा तिढा मागील अनेक वर्षांपासून कायम राहिला आहे. आ.डॉ.देवराव होळी यांनी जागेचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली. रावते यांनी एसटीचे बांधकाम विभागातील महाव्यवस्थापक जवंजाळ यांच्यासोबत बोलणी करून चामोर्शी येथील जागेचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, असे आवाहन केले.
यावेळी आमदारांसोबत भाजपाचे संघटनमंत्री रवींद्र ओल्लालवार, भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, गडचिरोली-चंद्रपूर विभागाचे विभागीय अभियंता राहुल मोडक उपस्थित होते.