रेल्वेच्या भुयारी मार्गामुळे चौकात वाढतेय वाहनांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:37 IST2021-03-17T04:37:10+5:302021-03-17T04:37:10+5:30
देसाईगंज : शहराच्या मध्यवर्ती भागातून रेल्वे गेल्याने देसाईगंज शहर दोन भागात विभागल्या गेले आहे. त्यामुळे पूर्वेकडील भागातून शहराच्या पश्चिम ...

रेल्वेच्या भुयारी मार्गामुळे चौकात वाढतेय वाहनांची गर्दी
देसाईगंज : शहराच्या मध्यवर्ती भागातून रेल्वे गेल्याने देसाईगंज शहर दोन भागात विभागल्या गेले आहे. त्यामुळे पूर्वेकडील भागातून शहराच्या पश्चिम भागात जाण्यासाठी भुयारी मार्गाची निर्मिती केली आहे. पूर्वेला असणारे रेल्वेफाटक, कुरखेडा बाजू व लाखांदूर बाजू या पूर्णतः बंद करण्यात आल्या. त्यामुळे निर्माण झालेल्या दाेन्ही चौकात प्रवासी वाहनांनी ठिय्या मांडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
रेल्वेच्या भुयारी मार्गामुळे चौकात वाहनांची गर्दी वाढत आहे.
शहराच्या दोन भागाच्या आवागमनासाठी भुयारी मार्गाची निर्मिती झाली असून, हा मार्ग नागमोडी वळणाचा आहे. त्यातच या मार्गाची उंची ही मर्यादित असल्याने काही अवजड वाहने सरळ कुरखेडा मार्गावरून बायपासने तर लाखांदूर मार्गाची अवजड वाहने बायपास मार्गाने जातात. त्यामुळे या चौकात भुयारी व बायपासने जाणाऱ्या वाहनांची नेहमीच क्रॉसिंग होते. त्यातल्यात्यात या चौकाच्या निर्मितीमुळे जी मोकळी जागा उपलब्ध झाली त्या ठिकाणी प्रवासी वाहने भुयारी मार्गाच्या तोंडावरच उभी राहत असल्याने भुयारी मार्गातून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना फारच अडचण निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील बसस्थानक हे आरमोरी-कुरखेडा या राज्य महामार्गावर असल्याने कमी पल्ल्यांच्या गाड्यांना यू टर्न घ्यावा लागतो. पण या वाहनांच्या गर्दीमुळे बस वळविण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे या वाहनांची होणारी गर्दी हटवून त्यांना पर्यायी व्यवस्था करून द्यावी, भुयारी मार्गातून होणारी वाहतूक सुकर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.