वाळवण पदार्थ तयार करण्याची पंरपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:37 IST2021-03-18T04:37:00+5:302021-03-18T04:37:00+5:30
बाजारात कृत्रिमरीत्या तयार केलेले विविध प्रकारचे पदार्थ मिळत असले तरी ग्रामीण भागातील महिला अद्यापही पारंपारिकरित्या हातावर अथवा साच्यावर पदार्थ ...

वाळवण पदार्थ तयार करण्याची पंरपरा कायम
बाजारात कृत्रिमरीत्या तयार केलेले विविध प्रकारचे पदार्थ मिळत असले तरी ग्रामीण भागातील महिला अद्यापही पारंपारिकरित्या हातावर अथवा साच्यावर पदार्थ तयार करतात दरवर्षी उन्हाळ्यात महिला रिकाम्या वेळेचा सदुपयोग करतात.
रब्बी पीक जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात निघते त्यानंतर महिलांना बऱ्याच प्रमाणात मोकळीक असते. या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी महिला विविध प्रकारचे वाळवण खाद्यपदार्थ तयार करतात. ग्रामीण भागात विशेषता कुरडया, सांडवे, पापड, आलू चिप, साबुदाण्याचे पापड, तांदळाचे पापड, वड्या यासह विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करीत असतात. मार्च व एप्रिल महिन्यात सदर पदार्थ तयार करतात. वड्या तयार करण्यासाठी उडीद, मूग, लाखोळी, कुरता आदीची डाळ वापरतात. उडदाच्या वड्या अधिक रुचकर लागतात. घरी उडीद नसले तरी बाजारातून खरेदी करून त्याची डाळ करतात वड्या तयार करतात. तसेच तांदळाच्या व गव्हाच्या पिठापासून कुरडया, पापड तयार करतात. बाजारातून मोठे बटाटे खरेदी करून त्याची चीप काढतात त्यानंतर ते उकळून वाळवतात. अनेक महिला या कामात मग्न असल्याचे दिसून येते विविध प्रकारच्या धान्यापासून तसेच कडधान्यापासून वाळवण पदार्थ तयार केले जाते. मागील अनेक वर्षापासून पारंपारिक पद्धतीने वाळवण पदार्थ तयार करण्याची परंपरा आहे. ही परंपरा अद्यापही कायम आहे. शहरांमध्ये बाजारातून अशा प्रकारची खाद्यपदार्थ खरेदी करतात. परंतु ग्रामीण भागात अद्यापही महिला उन्हाळ्यातील रिकाम्या वेळेचा सदुपयोग करून खाद्यपदार्थ तयार करतात विशेष वॉर्ड अथवा मोहल्यातील महिलांची मदत घेतात .एकमेकींना सहाय्य करून वाळवण पदार्थ तयार करण्याची ही पारंपारिक पद्धत अद्यापही कायम आहे. तंत्रज्ञानाच्या युगात विविध प्रकारची माहिती इंटरनेटवर उपलब्ध होते. ग्रामीण भागात सुध्दा इंटरनेट सेवा उपलब्ध असल्याने महिला, युवती इंटरनेटच्या माध्यमातून विविध खाद्यपदार्थ तयार केले जाते. पारपारिक पद्धतीला आधुनिकतेची जोड दिली जात आहे.