उत्तर गडचिरोलीत २० वर्षांनंतर नक्षल सप्ताहात व्यापारपेठ राहणार खुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:41 IST2025-07-29T14:40:48+5:302025-07-29T14:41:29+5:30

दहशत मोडीत : पोलिसांच्या आवाहनाला व्यापारी, नागरिकांचाही प्रतिसाद

Trading posts will remain open in North Gadchiroli during Naxal Week after 20 years | उत्तर गडचिरोलीत २० वर्षांनंतर नक्षल सप्ताहात व्यापारपेठ राहणार खुली

Trading posts will remain open in North Gadchiroli during Naxal Week after 20 years

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची :
नक्षलवाद्यांच्या हिंसक विचारसरणीविरोधात पोलिसांच्या सहकार्याने नागरिकांचा निर्धार बळावू लागला आहे. उत्तर गडचिरोलीतील व्यापाऱ्यांनी तब्बल दोन दशकांनंतर नक्षल सप्ताहात भीती झुगारून आपली दुकाने उघडली. २००६ मध्ये घडलेल्या हत्याकांडानंतर नक्षल सप्ताहात संपूर्ण व्यापारपेठ बंद ठेवली जात असे. मात्र, यंदा, २८ जुलैला पोलिसांच्या संरक्षणात व्यापाऱ्यांनी नक्षलींच्या दबावाला न जुमानता व्यवसाय सुरू ठेवत नवे साहस दाखविले.


हिंसक कारवायांची रणनीती निश्चित करून सुरक्षा यंत्रणांना आव्हान देण्यासाठी, तसेच मृत नक्षलवाद्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी नक्षली २८ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान सप्ताह पाळतात. २००६मध्ये याच कालावधीत उत्तर गडचिरोलीतील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याची माओवाद्यांनी गोळ्या घालून निघृण हत्या केली होती. त्या घटनेनंतर नक्षल सप्ताहात स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी, नक्षल सप्ताहात व्यापारपेठ अनेक वर्षे याच काळात बंद ठेवली जात होती. मात्र, यंदा २८ जुलैला तब्बल २० वर्षांनंतर स्थानिक पोलिस प्रशासनाच्या पुढाकारामुळे आणि विश्वासार्हतेमुळे व्यापाऱ्यांनी पहिल्यांदाच नक्षल सप्ताहात दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला. 


नक्षलवादी बॅकफूटवर
मागील वर्षीपासून नक्षल चळवळीतील प्रमुख जहाल नेते चकमकीत ठार झाले, अनेक माओवाद्यांनी आत्मसमर्पणसुद्धा केले. गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानाला यश मिळत आहे. त्यामुळे सध्या नक्षलवादी बॅकफूटवर आहेत. उत्तर गडचिरोली नक्षलमुक्त झाल्याची घोषणा पोलिसांनी यापूर्वीच केलेली आहे.


नेमकी काय पार्श्वभूमी ?
२००६ मध्ये कोरची शहरातील प्रतिष्ठित व्यापारी डॉ. प्यारेलाल अग्रवाल यांची दुकानात असताना दुपारी चार वाजण्याच्या सुमाराम नक्षल्यांनी बंदुकीने गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये कोरची शहरालगतच्या पकनापट्टी गावाजवळ रस्त्यालगत नक्षल्यांनी लावलेल्या बॅनरखाली भुसुरुंग स्फोट घडविला होता. बॅनर काढण्यास गेलेले कोरचीचे सहायक निरीक्षक अतुल तवाडे आणि एक हवालदार झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झाले होते. यानंतर २०२३ मध्ये अतिदुर्गम नवेझरी गावातील एका व्यक्तीला पोलिसांच्या खबरी असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी रात्री हत्या केली होती. त्यामुळे नक्षल्यांच्या सप्ताहात व्यापारी दुकाने बंद ठेवत असत.


सुरक्षा यंत्रणांविरुद्ध कारवाया करण्यासाठी

  • नक्षली टीसीओसी (टॅक्टिकल काउंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन) सप्ताहाचे आयोजन करतात. यंत्रणांना आव्हान देण्यासाठी हिंसक कारवाया करणे, अशी या सप्ताहामागची रणनीती असते.
  • जिल्ह्याच्या उत्तर दिशेवरील छत्तीसगड सीमेलगतच्या कोरची या आदिवासीबहुल तालुक्यात दरवर्षी नक्षल सप्ताहात दहशतीचे वातावरण असे.
  • यंदा मात्र २० वर्षापासूनची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पुढाकार घेतला. पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांनी नक्षल सप्ताहाच्या तीन दिवसांपूर्वी शहरातील व्यापाऱ्यांची सभा घेतली होती.
  • यात नक्षल सप्ताहात दुकाने व व्यापारपेठ सुरळीत सुरू ठेवावी, असे आवाहन करण्यात आले होते. पोलिसांच्या पुढाकाराने २८ रोजी सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षल्यांची दहशत नाकारत व्यापाऱ्यांनी उद्योग, व्यवसाय सुरळीत सुरू ठेवले. २० वर्षांनंतर पहिल्यांदाच नक्षल सप्ताहात नागरिकांची रेचलेच दिसून आली.


"कोरची येथील व्यापारी व नागरिकांनी दहशत झुगारत नवी सुरुवात केली आहे. त्यांना भयमुक्त वातावरण मिळावे यासाठी सुरक्षा जवान सतर्क आहेत. सीमावर्ती भागात अद्याप कोठेही नक्षल्यांचे पत्रक अथवा बॅनर, पोस्टर आढळलेले नाही. जिल्ह्यात अलर्ट जारी केला असून, सीमावर्ती भागात नक्षलविरोधी अभियान गतिमान केले आहे."
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली.

Web Title: Trading posts will remain open in North Gadchiroli during Naxal Week after 20 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.