आजपासून गुजरी बंद

By Admin | Updated: June 25, 2014 00:27 IST2014-06-25T00:27:53+5:302014-06-25T00:27:53+5:30

गुजरीमध्ये वाहने येण्यासाठी विठ्ठल मंदिराकडील मार्ग उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी गुजरीतील भाजीपाला विक्रेत्यांनी बुधवारपासून बेमुदत गुजरी बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

From today on, the passage is closed | आजपासून गुजरी बंद

आजपासून गुजरी बंद

भाजीपाल्याची टंचाई भासणार : रस्त्याचा वाद चिघळला
गडचिरोली : गुजरीमध्ये वाहने येण्यासाठी विठ्ठल मंदिराकडील मार्ग उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी गुजरीतील भाजीपाला विक्रेत्यांनी बुधवारपासून बेमुदत गुजरी बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
त्रिमूर्ती चौकाजवळील परिसरात मागील २५ ते ३० वर्षापासून गुजरी भरविली जात आहे. या गुजरीला अगदी सुरूवातीला तीन मार्ग होते. त्यापैकी एक मार्ग कायमचा बंद करण्यात आला आहे. ‘लोकमत’ कार्यालयाजवळील व विठ्ठल मंदिराकडील असे दोन मार्ग सध्या अस्तित्वात आहेत. मात्र ‘लोकमत’ कार्यालयाजवळील मार्ग अरूंद आहे. त्याचबरोबर या ठिकाणावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहत असल्याने जड वाहन नेणे शक्य होत नाही. विठ्ठल मंदिराकडील मार्ग गुजरीच्या दृष्टीने अत्यंत सोयीस्कर आहे. या मार्गावरून मागील २५ वर्षापासून नागरिक व वाहनांची ये-जा करीत आहेत. मात्र या मार्गावर विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट व एका नागरिकाने आपला अधिकार सांगितला आहे. त्याचबरोबर सदर मार्ग बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हा मार्ग उपलब्ध करून द्यावा यासाठी सर्वोदय सब्जी व्यापारी असोसिएशनतर्फे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र या निवेदनाची अजूनपर्यंत दखल घेण्यात आली नाही.
नगर परिषदेने सब्जीमंडीमध्ये १६ खोल्यांची चाळ, गुजरीचे काँक्रीटीकरण, नालीचे बांधकाम, शौचालय, मुत्रीघर तयार केले आहे. यासाठी जवळपास १ कोटी रूपये खर्च केले आहेत. गुजरीपासून नगर परिषदेला वर्षाकाठी १० ते १२ लाख रूपयाचे उत्पन्न प्राप्त होते. असे असतांनाही नगर परिषदेचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
गुजरीमध्ये वाहने आणण्यासाठी सदर मार्ग अत्यंत आवश्यक आहे. २५ वर्षापूर्वी अस्तित्वात असलेल्या मार्गावर मागील दीड वर्षापासून अधिकार सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सर्व कागदपत्रे नगर परिषदेने गोळा करावी, सदर जागा खासगी मालकीची व देवस्थानाच्या ट्रस्टची असेल ती खरेदी करून मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र मुख्याधिकारी, नगरसेवक, नगराध्यक्ष यांनी कायमचे दुर्लक्ष केले आहे. हा मार्ग बंद झाल्यास दुकानदारांना फार मोठी अडचण येणार आहे. सदर मार्ग कोणत्याही परिस्थितीत नगर परिषदेने उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी बुधवारपासून बेमुदत गुजरी बंद आंदोलन करण्याचा इशारा सर्वोदय सब्जी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र बाळेकरमकर, प्रफुल कोष्टी, महेश हजारे यांच्यासह इतरही व्यापाऱ्यांनी दिला आहे.
शहरवासीयांची भाजीपाल्याची गरज या एकट्या गुजरीच्या माध्यमातून भागविल्या जाते. ग्रामीण भागातील नागरिकही गुजरीतूनच भाजीपाला खरेदी करतात. त्यामुळे गुजरी बंद राहिल्यास भाजीपाल्याची फार मोठी टंचाई शहरवासीयांना भासणार आहे. त्यामुळे सदर आंदोलनावर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: From today on, the passage is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.