जनजागृतीच्या माध्यमातूनच तंबाखूमुक्ती शक्य
By Admin | Updated: September 1, 2014 23:34 IST2014-09-01T23:34:31+5:302014-09-01T23:34:31+5:30
तंबाखूजन्य पदार्थाच्या अधीन झालेल्या व्यसनाधीन मानसाचे व्यसन लवकर सुटत नाही. व्यसनमुक्तीसाठी मनाची पक्की तयारी पाहिजे. यासाठी जिल्हाभरात प्रबोधन होणे गरजेचे आहे.

जनजागृतीच्या माध्यमातूनच तंबाखूमुक्ती शक्य
गडचिरोली : तंबाखूजन्य पदार्थाच्या अधीन झालेल्या व्यसनाधीन मानसाचे व्यसन लवकर सुटत नाही. व्यसनमुक्तीसाठी मनाची पक्की तयारी पाहिजे. यासाठी जिल्हाभरात प्रबोधन होणे गरजेचे आहे. जनजागृतीच्या माध्यमातूनच तंबाखूमुक्ती होऊ शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले.
शहरातील गुरूदेव सेवा मंडळाच्या विविध शाखांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी येथील गुरूदेव सेवा मंडळाच्या मुख्य शाखेत आयोजित तंबाखूबंद मोहीम प्रबोधन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे होते. पुढे बोलताना डॉ. अभय बंग म्हणाले, तंबाखू सेवनाने मानसाच्या शरीर व आरोग्यावर विविध अनिष्ट परिणाम होतात. तंबाखू सेवनामुळे कॅन्सर, हृदयरोग, लकवा, रक्तदाब, वांझपणा आदी भयंकर रोग होतात. प्रसंगी तंबाखू सेवनाच्या अपायकारक परिणामुळे माणसाला आपला जीव गमवावा लागतो, असेही ते यावेळी म्हणाले. निकोप समाज निर्मितीसाठी व सुस्वास्थाच्या निर्मितीकरीता माणसाने तंबाखू, गुटखा, खर्रा आदी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन टाळणे गरजेचे आहे. गडचिरोली जिल्हा १०० टक्के तंबाखूमुक्त होण्यासाठी प्रत्येक शाळेतमध्ये कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी, गणेश व दुर्गोत्सवाच्या कार्यक्रमातही तंबाखूमुक्तीवर प्रबोधन झाले पाहिजे, बचत गटाच्या महिलांनी व्यसनाविषयी जागृती निर्माण करावी तसेच याशिवाय जिल्ह्यातील किर्तनकार, प्रवचनकार व भजन मंडळांनी सामुहिक कार्यक्रमातून तंबाखूविरोधी जनजागृती मोहीम राबवावी, असेही डॉ. बंग यावेळी म्हणाले.
डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी गुरूदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाजाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले. तसेच सध्याचा तरूण वर्ग व्यसनाच्या विळख्यात सापडला आहे. अशा व्यसनाधीन युवकांना व्यसनापासून मुक्त करणे हीच खरी सामुदायीक प्रार्थना होऊ शकते, असेही डॉ. कुंभारे यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाला सर्वोदय मित्र मंडळाचे पदाधिकारी डॉ. मुर्लीधर बद्दलवार, विलास निंबोरकर, देवानंद कामडी, काळे, भारत स्वाभीमान संघटनेचे पदाधिकारी विवेक चडगुलवार, संभाजी मोहुर्ले, खोब्रागडे, सोदुरवार, दहिकर, दलितमित्र नानाजी वाढई, सुरेश मांडवगडे, निशाने, विश्वनाथ पेंदाम, दामजी नैताम, सुखदेव वेटे, जिल्हा प्रचारक जयराम खोब्रागडे आदीसह सर्वोदय मित्र मंडळ, स्वाभीमान संघटना तसेच गुरूदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन विलास निंबोरकर यांनी केले तर आभार गुरूदेव सेवा मंडळाचे सचिव पंडीतराव पुडके यांनी मानले. यशस्वीतेसाठी पंकज भोगेवार, श्रीकांत जोशी यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)