गडचिरोलीत मालवाहू ऑटोला टिप्परची धडक; दोन ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 21:08 IST2020-03-05T21:07:43+5:302020-03-05T21:08:01+5:30
आल्लापल्लीकडून चंद्रपूरच्या दिशेने जात असलेल्या टिप्परने (एएम १३, सीयू ०४२०) जोरदार धडक दिली. यात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला.

गडचिरोलीत मालवाहू ऑटोला टिप्परची धडक; दोन ठार, एक गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येथून ७ किलोमीटवर असलेल्या तानबोडी फाट्याजवळ चंद्रपूरकडून शितपेये घेऊन येणाऱ्या मालवाहू ऑटोला आल्लापल्लीकडून चंद्रपूरच्या दिशेने जात असलेल्या टिप्परने (एएम १३, सीयू ०४२०) जोरदार धडक दिली. यात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात ५ मार्च रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडला.
ही धडक इतकी जबरदस्त होती की ऑटोमध्ये बसलेल्यांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले. तसेच नवीन असलेल्या ऑटोचेही तुकडे झाले. मृतांमध्ये अमरिश रामचंद्र पांढरे (४०) आणि दुसऱ्या व्यक्तीचे नाव पिंटू (३५) असल्याचे समजले. ते दोघेही चंद्रपूर येथील रहिवासी होत. गंभीर जखमी असलेल्या तिसऱ्या व्यक्तीचे नाव कळू शकले नाही, पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने समजते.
अपघाताची माहिती मिळताच प्राणहिता पोलीस उपमुख्यालयातील मोटार परिवहन विभागाचे उपनिरीक्षक सुधाकर कुमरे यांनी चमूसह घटनास्थळ गाठले आणि क्रेन पाठवून वाहने व मृतदेह काढले. अधिक तपास पो.निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या नेतृत्वात एपीआय बाळासाहेब शिंदे, पीएसआय विनायक दडस करीत आहे.