चिमुकल्याच्या मृतदेहासाठी ‘कावडी’ची वेळ ; आदिवासींच्या नशिबी मरणानंतरही यातनाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 19:03 IST2025-08-25T19:02:36+5:302025-08-25T19:03:08+5:30

Gadchiroli : पर्लकोटा पूल तीन वर्षांपासून रखडला, ११२ गावं दरवर्षी जगापासून तुटतात !

Time for 'Kavadi' for the body of a child; The fate of tribals is suffering even after death | चिमुकल्याच्या मृतदेहासाठी ‘कावडी’ची वेळ ; आदिवासींच्या नशिबी मरणानंतरही यातनाच

Time for 'Kavadi' for the body of a child; The fate of tribals is suffering even after death

भामरागड : तोकड्या पायाभूत सुविधा, त्यात पूर, पाण्याची आपत्ती अशा दुहेरी संकटांचा सामना दुर्गम, अतिदुर्गम भागातील आदिवासींना पावसाळ्यात करावा लागतो. सरत्या आठवड्यात सलग चार दिवस पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पर्लकोटा नदीला आलेल्या पुराने भामरागड तालुका मुख्यालयासह शेकडो गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला. दुर्दैवाने चार दिवसांत पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यातील कोयार गावच्या चिमुकल्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेताना खाटेची कावड करावी लागली. जीवंतपणी हालअपेष्टा सोसणाऱ्या गरीब आदिवासींच्या नशिबी मरणानंतर अंतिम प्रवासातही यातनाच वाट्याला याव्यात ही मोठी शोकांतिका.


भामरागडमध्ये 'पर्लकोटा'वरील पूल होणार तरी कधी ?
आल्लापल्ली - भामरागड - लाहेरी - बिनागुंडा -नारायणपूर राष्ट्रीय महामार्गावरील (१३० डी) भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीवरील पुलाचे काम तीन वर्षांपासून रखडले आहे. पावसात जुना पूल पाण्याखाली जातो व तालुक्यातील ११२ गावांचा संपर्क तुटतो.
या पुलासाठी संपादित केलेल्या जागेचा वाद न्यायालयात सुरु आहे. हा वाद सोडवून आंतरराज्य महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी प्रशासन पुढाकार कधी घेणार, हा प्रश्न आहे. अनेक वर्षापासून या भागातील नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.


पूरग्रस्तांना आर्थिक साहाय्य, पण परवड कधी थांबणार ?

  • पूरस्थितीत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत केली जाते. ही मदत संबंधितांना पोहोचविली म्हणजे जबाबदारी संपते का, हा खरा प्रश्न आहे.
  • वनकायद्यांच्या कचाट्यात, न्यायालयीन प्रकरणांत अडकलेले प्रकल्प, विकासकामे तातडीने व्हावीत, यासाठी प्रशासन काही हालचाली करणार आहे की नाही, प्रत्येक पावसाळ्यात स्थानिकांना आपला जीव गमवावा लागत असेल, तर शासनाने फक्त आर्थिक मदत करून थांबणे हा तोडगा ठरू शकत नाही. कायमस्वरूपी उपाययोजना आणि पायाभूत सुविधा उभारणे हेच या 'आपत्ती'ला खरे उत्तर आहे.

Web Title: Time for 'Kavadi' for the body of a child; The fate of tribals is suffering even after death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.