टिल्लूपंप जप्ती मोहीम सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:26 IST2019-04-15T22:26:07+5:302019-04-15T22:26:27+5:30
गडचिरोली शहरानजीकच्या वैनगंगा नदीची पाणीपातळी दरवर्षीच्या उन्हाळ्यात खालावत असल्याने शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. दरम्यान उन्हाळ्यात पालिकेच्या वतीने टिल्लू पंप जप्ती मोहिम हाती घेण्यात येते. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात सदर टिल्लू पंप जप्ती मोहीम एजंसीमार्फत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मिळाली आहे.

टिल्लूपंप जप्ती मोहीम सुरू होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहरानजीकच्या वैनगंगा नदीची पाणीपातळी दरवर्षीच्या उन्हाळ्यात खालावत असल्याने शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. दरम्यान उन्हाळ्यात पालिकेच्या वतीने टिल्लू पंप जप्ती मोहिम हाती घेण्यात येते. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात सदर टिल्लू पंप जप्ती मोहीम एजंसीमार्फत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मिळाली आहे.
पालिकेच्या वतीने टिल्लू पंप जप्ती मोहिम शहरात राबविण्यासाठी निविदा प्रक्रिया बोलावून एजंसीची निवड करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने गतीने कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे सदर काम एजंसीला देण्यात यावे, असा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत यापूर्वीच घेण्यात आला आहे.
गडचिरोली शहरात एकूण १२ प्रभाग असून २५ वॉर्ड आहेत. पालिकेची नळ पाणीपुरवठ योजना वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटावर कार्यान्वित करण्यात आली आहे. शहरात जवळपास सात जलकुंभ उभारण्यात आले असून नदीपात्रात इनटेक वेल व नदीच्या वर मोठी टाकी बसविण्यात आले आहेत. याशिवाय बोरमाळा मार्गावर पालिकेने जलशुद्धीकरण केंद्र बसविले आहे.
शहरातील रामनगर, गणेशनगर तसेच विसापूर, विसापूर टोलीसह काही भाग चढ आहे. दरवर्षीच्या उन्हाळ्यात वैनगंगा नदीची पाणीपातळी खालावत असल्याने नळ योजनेच्या इनटेक वेलमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात येत नाही. शिवाय पाणी टाकीमध्ये मुबलक प्रमाणात पाणी येत नाही. त्यामुळे शहराच्या बऱ्याच भागात नळाद्वारे पाणी पोहोचत नाही. अशा स्थितीतही शहराच्या बºयाच भागात वरच्या मजल्यावर अनेक नागरिक टिल्लू पंप लावून पाणी खेचतात. परिणामी अनेक नळधारकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही.
सध्यास्थितीत शहरातील गणेशनगर, रामनगर, विसापूर, विसापूर टोली, स्नेहनगर व इतर काही वॉर्डात पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे. नदीची पाणीपातळी खालावल्यामुळे गेल्या महिनाभरापासून केवळ सकाळच्या सुमारास एकदाच नळाला पाणी सोडले जात आहे. गडचिरोली शहरात पालिकेने बसविलेली नळ पाईपलाईन ही खुप जुनी असून सदोष आहे. त्यामुळे नळाद्वारे पाण्याचे असमान वितरण होत आहे. या समस्येला मार्गी लावण्यासाठी आता पालिकेच्या वतीने एजंसीमार्फत टिल्लू पंप जप्ती मोहिम हाती घेण्यात येणार आहे. ज्या नळधारकाच्या घरी नळाला टिल्लू पंप लावून पाणी खेचत असल्याचे दिसून आल्यास संबंधित नळधारकाकडून प्रत्येकी दोन हजार रूपयांचे दंड आकारण्यात येणार आहे. यातील जवळपास निम्मी रक्कम संबंधित एजंसीला मिळणार आहे.
गतवर्षी ७० टिल्लू पंप जप्त
गतवर्षीच्या उन्हाळ्यात मार्च महिन्यापासूनच नगर पालिकेच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांमार्फत टिल्लू पंप जप्ती मोहिम राबविण्यात आली. दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत पालिकेच्या वतीने गतवर्षी जवळपास ७० टिल्लू पंप जप्त करून संंबंधित टिल्लू पंपधारकावर दोन हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला. यापैकी अनेकांनी दंडाची रक्कम भरून आपले टिल्लू पंप सोडविले नाही. यावर्षीही अनेक वॉर्डात आत्तापासूनच नळाला पाणी येत नसल्याच्या अनेक तक्रारी पालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची दखल घेऊन मुख्याधिकाºयांनी एजंसीमार्फत टिल्लू पंप जप्ती मोहिम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहिम एप्रिल अखेर सुरू करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.