हृदयद्रावक! आठ महिन्यांच्या गर्भवतीवर वाघाचा हल्ला; शेतातून नेलं फरफटत; गडचिरोली जिल्ह्यातील प्रकार, गावावर शाेककळा
By गेापाल लाजुरकर | Updated: December 6, 2024 22:41 IST2024-12-06T22:40:32+5:302024-12-06T22:41:53+5:30
कुरखेडातील घटना, शारदा महेश मानकर असे २४ वर्षीय महिलेचे नाव

हृदयद्रावक! आठ महिन्यांच्या गर्भवतीवर वाघाचा हल्ला; शेतातून नेलं फरफटत; गडचिरोली जिल्ह्यातील प्रकार, गावावर शाेककळा
गाेपाल लाजूरकर, गडचिराेली: दाेन जीवाची बाई. घरातील कामे उरकून शेतातील खळ्यावरचे धान गाेळा करण्याकरिता अन्य तीन महिलांसमवेत शेतात गेली. चारही महिला आपापल्या शेतातल्या खळ्यावरील धान गाेळा करत हाेत्या. यापैकीच गर्भवती शारदासुद्धा जंगलालगतच्या शेतात धान गाेळा करत असतानाच वाघाने हल्ला करीत जंगलाच्या दिशेने फरफटत नेले. वाघाच्या या हल्ल्यात त्या महिलेचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गडचिराेली तालुक्याच्या कुरखेडा (सावरगाव) येथे शुक्रवार, ६ डिसेंबर राेजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.
शारदा महेश मानकर (२४) रा. कुरखेडा, ता. गडचिराेली असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे. जिल्ह्यात धान बांधणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत, तर मळणीची कामे सुरू झालेली आहेत. कुरखेडा येथील महेश मानकर हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्या शेतातील धानाची मळणी दाेन दिवसांपूर्वी थ्रेशर मशीनद्वारे झाली. साेबतच परिसराच्या शेतकऱ्यांनीसुद्धा मळणी केली हाेती. मळणी केल्यानंतर धान गंजीवरील व परिसरात पसरलेले धान गाेळा करण्यासाठी शारदा मानकर व अन्य तीन महिला आपापल्या शेतात सकाळी ११ वाजेच्या सुमारास गेल्या. धान गाेळा करण्याच्या कामात व्यस्त असतानाच जंगलातून वाघ शारदा यांच्या दिशेने आला व त्यांच्यावर हल्ला करून जंगलाच्या दिशेने त्यांना फरफटत नेऊ लागला. याचवेळी परिसराच्या बांध्यांमध्ये असलेल्या महिलांनी शारदा यांची किंचाळी ऐकून आरडाओरड केली. काही वेळाने वाघाने आपला जबडा शैल करून जंगलाच्या दिशेने पळ काढला. मात्र, ताेपर्यंत शारदा यांची प्राणज्याेत मालवली. घटनेची माहिती मिळताच चातगाव वनपरिक्षेत्राचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
तीन वर्षांच्या मुलाचे मातृछत्र हरवले
शारदा व महेश मानकर यांना तीन वर्षांचे एक मूल आहे. आता दुसऱ्यांदा शारदा ह्या ८ महिन्यांच्या गर्भवती हाेत्या. घरातील सर्व कामे करून शेतीकामातही त्या महेश यांना मदत करीत असत. वाघाच्या हल्ल्यात त्या ठार झाल्याने तीन वर्षीय मुलाचे मातृछत्र कायमचे हरपले.