सरपण गाेळा करणाऱ्या तीन महिलांवर अस्वलांचा हल्ला
By गेापाल लाजुरकर | Updated: April 27, 2024 18:51 IST2024-04-27T18:48:46+5:302024-04-27T18:51:20+5:30
भामरागडात उपचार : आरडाओरड केल्याने वाचला जीव

Three women attacked by bears
गडचिराेली : गावालगतच्या जंगलात सरपण गाेळा करणाऱ्या तीन महिलांवर तीन अस्वलांनी हल्ला केला. आरडाओरड केल्याने अस्वलांनी जंगलात धूम ठाेकली. ही घटना पुसिंगटाेला येथे शनिवार, २७ एप्रिल राेजी सकाळी ११ वाजता घडली. या महिलांवर भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जखमी महिलांमध्ये सुनीता विलास उसेंडी, मुंगळी विजा पुंगाटी व सविता रमेश उसेंडी आदींचा समावेश आहे.
भामरागड तालुक्याच्या पुसिंगटोला येथील महिला सरपण गाेळा करण्यासाठी सकाळी १० वाजेच्या सुमारास जंगलात गेल्या हाेत्या. गावाला लागूनच हे जंगल आहे. सरपण गाेळा करीत असतानाच सकाळी ११ वाजता या तीन महिलांवर तीन अस्वलांनी हल्ला केला. तेव्हा महिलांनी आरडाओरड सुरू केली. महिलांच्या जाेराच्या आवाजामुळे अस्वलांनी जंगलात धूम ठाेकली. अस्वलांच्या हल्ल्यात महिला किरकाेळ जखमी झाल्या. त्यांना अन्य नागरिकांच्या मदतीने भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. तेथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धाेक्याबाहेर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.