प्राप्त माहितीनुसार, बेडगाव घाटातील पहाडावर छत्तीसगढ राज्यातील एक ट्रक बिघडल्याने त्या ट्रकला टोचन बांधून राजनांदगावाकडे नेले जात होते. याचवेळी समोरून दुसरा ट्रक कुरखेडाच्या दिशेने येत होता. पण, घाटात ब्रेक न लागल्याने ते ट्रक एकमेकांवर आदळले. त्यात दोन ट्रकचे चालक व क्लीनरला सौम्य स्वरूपात मार लागला. परंतु टोचन बांधून आणत असलेल्या ट्रकचा चालक जयप्रकाश टंडन (रा. दुर्ग, छत्तीसगढ) हा स्टेअरिंगमध्ये फसला. दुसऱ्या ट्रकचा चालक घाबरलेल्या अवस्थेत एकटाच त्याला काढण्याचा प्रयत्न करीत होता. पण, त्याला ते शक्य होत नव्हते. यादरम्यान शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल हे माजी शहरप्रमुख विजय पुस्तोडे, डॉ. अनिल उईके यांच्यासोबत कोरची तालुक्यातील काही गावांना भेट देण्यासाठी जात होते. त्यांनी ट्रकच्या केबिनवर धाव घेऊन फसलेल्या चालकाला काढण्यासाठी मदत करू लागले. चिलमटोला (बेडगाव) येथील एक युवकही मदतीस आला. अखेर, त्यांनी लोखंडी रॉडने केबिन तोडून चालकाला बाहेर काढले. चंदेल यांनी स्वत:च्या चारचाकी गाडीत टाकून चालकाला कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.
घाटात तीन ट्रकची एकमेकांना धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:39 IST