‘त्या’ लैंगिक शोषण प्रकरणात आणखी तीन संशयित व्यक्तींची नावे आली पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:00 IST2021-02-20T05:00:00+5:302021-02-20T05:00:00+5:30
घरकाम करणाऱ्या आदिवासी अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्याशी आरोपींनी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे ती गर्भवती राहिली. ही बाब वैद्यकीय चाचणीनंतर लक्षात आल्याने व प्रसार माध्यमातून हे प्रकरण गाजल्याने शासनाच्या वतीने कोरची पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात २३ ऑगस्ट २०२० ला भादंवि कलम ३७६ (२)(जे) तसेच पोस्को कायद्याच्या कलम ४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

‘त्या’ लैंगिक शोषण प्रकरणात आणखी तीन संशयित व्यक्तींची नावे आली पुढे
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोरची : एका अल्पवयीन आदिवासी युवतीचे लैंगिक शोषण करून तिच्यावर मातृत्व लादल्याप्रकरणी एका व्यावसायिकाला अटक झाली होती. त्या आरोपीची डीएनए चाचणी काही दिवसानंतर निगेटिव्ह आल्यानंतर जामिनावर सुटकाही झाली. आता या प्रकरणात आणखी तीन संशयितांची नावे पुढे आल्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढली असून युवतीच्या पोटी जन्माला आलेल्या बाळाचा खरा बाप कोण, हे शोधून काढण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
घरकाम करणाऱ्या आदिवासी अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्याशी आरोपींनी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे ती गर्भवती राहिली. ही बाब वैद्यकीय चाचणीनंतर लक्षात आल्याने व प्रसार माध्यमातून हे प्रकरण गाजल्याने शासनाच्या वतीने कोरची पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात २३ ऑगस्ट २०२० ला भादंवि कलम ३७६ (२)(जे) तसेच पोस्को कायद्याच्या कलम ४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणात आरोपी म्हणून किरण अग्रवाल या व्यावसायिकाला ऑगस्ट २०२० मध्येच अटक झाली होती. पण डीएनए चाचणीचा रिपोर्ट जुळत नसल्याने पोलीसही चक्रावून गेले. त्यामुळे तपासाची चक्रे पुन्हा सुरू झाली. दरम्यान या प्रकरणातील पीडित युवतीने आणखी तीन संशयित व्यक्तींची नावे पोलिसांजवळ घेतली. त्यामुळे त्या तिघांपैकी बाळाचा खरा बाप कोण असावा, याबद्दल नागरिकांमध्ये विविध चर्चेला उधाण आले आहे. आता त्या तीन लोकांच्या डीएनए चाचणीनंतरच खर काय ते पुढे येणार आहे. त्या तीन संशयित लोकांना १७ फेब्रुवारीला कुरखेड़ाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा या प्रकरणाचे तपास अधिकारी जयदत्त भवर यांनी ताब्यात घेतले. एवढेच नाही तर त्यांचे डीएनए नमुने चाचणीसाठी फाॅरेन्सिक लॅबमध्ये पाठविले आहे.
एसडीपीओ भंवर यांना विचारले असता, या प्रकरणातील पीडितेने नाव घेतलेल्या तीन संशयित व्यक्तींची चौकशी करून त्यांचे डीएनए नमुने चाचणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले. त्यानंतर या तिघांना सूचनापत्र देऊन सोडल्याचे त्यांनी सांगितले. प्रकरणी अजून कोणकोण आरोपी समोर येतात आणि बाळाचा खरा बाप कोण? याचा शोध लावण्यात पोलीस यशस्वी होतात का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सर्वावरच गुन्हा दाखल होणार?
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पीडित युवतीने एका व्यावसायिकाचे नाव घेतले. तो एकमेव आरोपी आहे असे गृहित धरून पोलिसांनी कारवाई केली. मात्र डीएनए चाचणीच्या रिपोर्टनंतर पोलिसांनी पुन्हा युवतीला सखोल विचारपूस केली तेव्हा आणखी तीन जणांचे नावे पुढे आली. त्यामुळे पीडित युवतीचे शोषण एकापेक्षा जास्त आरोपींनी केल्याचे दिसून येत आहे.
या प्रकरणात आता चार आरोपी झाले आहेत. त्यापैकी ज्याच्याशी डीएनए जुळेल तो मुख्य आरोपी असला तरी इतर लोकांवरही लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा कायम राहू शकतो. प्रत्यक्ष पीडित मुलीनेच त्यांची नावे घेतल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र तूर्त पोलिसांनी त्या तिघांवर गुन्हा दाखल केलेला नाही.