आरमोरीतील १३ दारू विक्रेत्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:27 IST2019-07-26T00:26:58+5:302019-07-26T00:27:39+5:30
लोकमतने आरमोरी शहरात विविध ठिकाणी विकल्या जाणाऱ्या दारूची माहिती उघड करताच पोलिसांनी गंभीर दखल घेत धडक कारवाईला सुरूवात केली आहे. त्यामुळे दारू विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. लोकमतने दि.१८ व २१ जुलैच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते.

आरमोरीतील १३ दारू विक्रेत्यांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : लोकमतने आरमोरी शहरात विविध ठिकाणी विकल्या जाणाऱ्या दारूची माहिती उघड करताच पोलिसांनी गंभीर दखल घेत धडक कारवाईला सुरूवात केली आहे. त्यामुळे दारू विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. लोकमतने दि.१८ व २१ जुलैच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते.
वृत्ताची दखल आरमोरीचे ठाणेदार सुरेश चिल्लावार यांनी घेतली. स्वत:च्या नेतृत्वात पोलिसांचे पथक तयार करून आरमोरी तालुका व शहरातील १३ दारू विक्रेत्यांना अटक केली. दोन आरोपी फरार आहेत. त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे आरमोरी तालुक्यातील दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
आरमोरी शहरात दारू विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला होता. याबाबतचे पहिले वृत्त १८ जुलै रोजी प्रकाशित झाले. या वृत्तामुळे दारू विक्रेते हादरून गेले. त्यांना काही पोलिसांचे छुपे पाठबळ असल्याने कारवाई टाळण्यासाठी काही दिवस दारू विक्री बंद होती. मात्र लोकमतने पुन्हा दारू विक्रेत्यांचा डाव उधळत दि.२१ ला बातली प्रकाशित केली. या वृत्ताची दखल ठाणेदार चिल्लावार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली. आरमोरी शहर व तालुक्यात दारू विक्रेत्यांची माहिती मागितली. स्वत:च्या नियंत्रणाखाली पोलिसांचे पथक तयार केले. सोमवारपासून दारू विक्रेत्यांविरोधात कारवाईला सुरूवात केली. पोलिसांनी वडधा येथील प्रेमिला कोडवते, पिपरटोलातील रामदास कुमोटी, वासाळातील निशा मेश्राम, अरसोडा येथील लक्ष्मण सिंग, कतारसिंग, कृष्णा सेलार, वैरागड येथील सुमित्रा मुंगीकोल्हे, काळागोटा येथील राहूल रामटेके, गायकवाड चौकातील नरेश पराते, संतोष सिंग यांच्या घरी धाड टाकून त्यांना अटक केली आहे. मागील तीन दिवसात सुमारे १३ दारू विक्रेत्यांना अटक केली आहे. विविध कारवायांमध्ये २ लाख ६६ हजार रुपयांची दारू, एक चारचाकी, चार दुचाकी वाहने जप्त केली. सदर कारवाई पोलीस निरिक्षक सुरेश चिल्लावार, सहायक पोलीस निरिक्षक पंकज बन्सोड, पीएसआय बाळासाहेब दुधाळ, पोलीस हवालदार गोपाल जाधव, नरेश वासेकर, अकबर कोयाम यांनी केली.