अरविंद चव्हाणच्या मागावर एसीबीचे तीन पथक
By Admin | Updated: December 23, 2014 23:03 IST2014-12-23T23:03:27+5:302014-12-23T23:03:27+5:30
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा कोरची पं.स.तील शाखा अभियंता अरविंद बहाद्दूरसिंग चव्हाण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गडचिरोली येथे गुन्हा दाखल करताच

अरविंद चव्हाणच्या मागावर एसीबीचे तीन पथक
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा कोरची पं.स.तील शाखा अभियंता अरविंद बहाद्दूरसिंग चव्हाण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गडचिरोली येथे गुन्हा दाखल करताच सोमवारपासून फरार झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गडचिरोली येथील कार्यालयाने चव्हाणच्या शोधार्थ तीन पथक सोमवारीच तैनात केले असून सोमवारी धानोरा, कोरची व गोंदिया येथे पथक रवाना करण्यात आले. मात्र कोरची येथून अभियंता चव्हाण गुन्हा दाखल होताच कार्यालयीन दैनंदिनीत दौरा दाखवून पसार झाला असावा, अशी शक्यता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक दामदेव मंडलवार यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
एसीबीचे पथक गोंदिया येथे चव्हाणच्या घरी गेले होते. मात्र चव्हाण घरी सापडला नाही. कोरची येथे चव्हाणला शोधण्यासाठी पं.स. कार्यालयात पथक पाठविण्यात आले होते. मात्र चव्हाण मसेली, वट्रा भागात गावांमध्ये दौऱ्यावर गेला आहे, असे हलचल रजिस्टरच्या नोंदीवरून दिसून आले. हा भाग नक्षलीदृष्ट्या संवेदनशिल असल्याने या भागात पोलीस पथक जाऊ शकले नाही. त्यामुळे चव्हाणला अटक करण्यास सोमवारी अडचण आली, असेही एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मात्र चव्हाणला अटक करण्यात एसीबीला लवकरच यश येईल, असा विश्वास मंडलवार यांनी व्यक्त केला आहे. चव्हाण याच्याकडे ९ लाख ४९ हजार ७९ रूपयाची उत्पन्न स्त्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता आढळून आल्याने त्यांच्याविरोधात गडचिरोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चव्हाणवर यापूर्वीही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तत्कालीन काँग्रेस आमदाराने चव्हाणसाठी आपले वजन वापरून चव्हाणचा बचाव करण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. त्यानंतर चव्हाणला सिरोंचा येथे नियुक्ती देण्यात आली होती.
धानोरा पंचायत समितीत असताना चव्हाणच्या भ्रष्टाचाराविरोधात पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुन्नीश्वर बोरकर यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. त्याची चौकशीही करण्यात आली. चव्हाण याला तत्काळ अटक करून शासकीय सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी पिरिपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)