‘त्या’ ५० विद्यार्थ्यांची माऊली हरपली

By Admin | Updated: February 20, 2015 01:04 IST2015-02-20T01:04:27+5:302015-02-20T01:04:27+5:30

अतिशय दुर्गम भागात राहून ज्यांनी कधी गावातल्याही शाळेत शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहिले नसते. कंदमुळे खाऊन कसे तरी जीवन जगणे त्यांच्या वाट्याला आले असते,...

'Those' 50 students of Mauli Harpali | ‘त्या’ ५० विद्यार्थ्यांची माऊली हरपली

‘त्या’ ५० विद्यार्थ्यांची माऊली हरपली

गडचिरोली : अतिशय दुर्गम भागात राहून ज्यांनी कधी गावातल्याही शाळेत शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहिले नसते. कंदमुळे खाऊन कसे तरी जीवन जगणे त्यांच्या वाट्याला आले असते, अशा ५० विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना पुण्यात नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षणाची सोय पालकमंत्री म्हणून आर. आर. पाटील यांनी करून दिली. आबांच्या अकाली जाण्याने आपली माऊली हरपली, याचे दु:ख या विद्यार्थ्यांमध्ये आहे. तर आमच्या मुलाच्या मातीच्या गोळ्याला आबांनी परिसाचा स्पर्श करून त्याचे सोने केले, ही भावना एटापल्ली येथील मनोहर भगवान बोरकर या पालकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.
जानेवारी २०१० पासून गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून आर. आर. पाटील यांनी कामाला सुरूवात केली होती. ५ आॅगस्ट २०११ ला जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील ५० विद्यार्थ्यांना पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी लोकसेवा प्रतिष्ठानद्वारा संचालित सुभाषचंद्र बोस सैनिकी व इंग्रजी माध्यम विद्यालय फुलगाव पुणे येथे शिक्षणाला पाठविण्याचा निर्णय घेतला. गडचिरोलीसारख्या मागास भागात राहून ज्यांच्या वाट्याला सदैव दारिद्र्याचे जीणे आले होते, अशा असंख्य पालकांसाठी आपला मुलगा, मुलगी पुण्याला शिक्षणाला जाणार ही बातमी आनंदाला उधाण आणणारी होती. आर. आर. पाटील यांच्या रूपाने पालकांसाठी देवदूतच धावून आला होता.
यातीच एटापल्ली येथील एक पालक व सामाजिक कार्यकर्ते मनोहर बोरकर यांनी १ मे २०११ रोजी आर. आर. पाटील यांना पत्र लिहून त्यांच्या उपक्रमाबद्दल कृतज्ञतेची भावना कळविली. या पत्राला ९ मे २०११ ला उलट टपाली उत्तरही गृहमंत्री असलेल्या आबांनी वेळ काढून धाडले होते. या पत्रात आर. आर. पाटील यांनी ज्या भागाचा विकास झाला आहे, समृध्द झाला आहे, अशा ठिकाणी जाऊन काम करायला सगळे तयार असतात. मात्र अविकसित, मागास आणि आदिवासी क्षेत्रात जाऊन मनासारखे काम करता यावे. खरी सामाजिक बांधिलकी जपता यावी, यासाठी मी जाणीवपूर्वक गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले. प्रश्न अनेक असले तरी त्यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे. यात आपल्या सारख्यांचा मिळणारा पाठींबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज असून ते आपण सुरू केले आहेत, अशी भावना आबांनी व्यक्त केली होती.
गडचिरोली जिल्ह्यातून पुण्यात गेलेली ही मुले कसे शिक्षण घेत आहे हे दाखविण्यासाठी गडचिरोलीच्या पत्रकारांना तेथे आबांनी पाठविले होते. आज आबा आपल्यात नाहीत. ते अकाली निघून गेलेत. पुणे येथे गेलेले गडचिरोलीचे सारे विद्यार्थी आपण पोरके झालो, अशी भावना व्यक्त करीत आहेत. पुणे येथे शिकणाऱ्या यशस्वी मनोहर बोरकर या विद्यार्थिनीच्या पालकांनी आबामुळे आमच्या मुलांचे परिसाच्या स्पर्शाने मातीचे सोने व्हावे, तसे झाले आहे, अशी भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

Web Title: 'Those' 50 students of Mauli Harpali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.