पूर नियंत्रणासाठी उपाययोजना नाही
By Admin | Updated: July 12, 2014 01:12 IST2014-07-12T01:12:52+5:302014-07-12T01:12:52+5:30
दरवर्षीचा पावसाळा भामरागडसाठी धोक्याची घंटाच वाजवित असतो. भामरागड गावासभोवताल असलेल्या नद्या व नाले भामरागडला ....

पूर नियंत्रणासाठी उपाययोजना नाही
भामरागड : दरवर्षीचा पावसाळा भामरागडसाठी धोक्याची घंटाच वाजवित असतो. भामरागड गावासभोवताल असलेल्या नद्या व नाले भामरागडला पुराच्या काळात बेटाचे स्वरूप आणतात व वाहतूकही खंडीत होऊन जाते. यावर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यात शासनाला अजूनही यश आलेले नाही.
भामरागड-आलापल्ली मार्गावर जुने व ठेंगणे रपटे आहे. दर पावसाळ्यात या रपट्यांवर पाणी चढते व हा मार्ग बंद होतो. ३५ हजार लोकसंख्या असलेल्या या तालुक्यातील पुलाचे काम करण्यात शासनाने उदासिनता दाखविली आहे. भामरागड गावाची वस्ती दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांनी येथे नव्या जागांवर घरे बांधलीत. नदी तिरावरही नागरी वस्ती झाली. दरवर्षी पर्लकोटा नदीचा पूर गावात शिरतो व विश्वेश्वरराव चौकापर्यंत पाणी येते. त्यामुळे नागरिकांना मोठे नुकसान सहन करावे लागते. २००७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पूल उंच करून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ही समस्या अजूनही सुटलेली नाही. गतवर्षी जिल्ह्याचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी पर्लकोटा नदीवरचा पूल उंच करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही या पुलाचे काम सुरू झालेले नाही. निविदाही काढण्यात आल्या, अशी माहिती देण्यात आली होती. परंतु याबाबत काहीही हालचाली नाहीत. भामरागड गावाचे योग्य जागी पुनर्वसन करण्याचाही एक प्रस्ताव होता. तो ही बासणात गुंडाळून आहे. भामरागड सभोवताल कुमरगुंडा, पेरमिली, बांडीया, चंद्रनाला, मेडपल्ली हे नाले आहेत. यांच्यावरचेही पूल ठेंगणे आहेत. त्यामुळे पेरमिली नाला भरला की, भामरागडचा संपर्क तुटतो. परंतु प्रशासनाची उपाययोजना मात्र थंडबस्त्यात आहे.
पावसाळ्याच्या काळात मदत कार्यासाठी एक बोट दरवर्षी दिली जाते. गेल्या दोन-तीन वर्षात सततच्या पावसामुळे भामरागडचा पाच ते सात दिवस संपर्क तुटल्याच्या घटनाही घडल्या.
बरेच वेळा पुराच्या काळात अधिकारीही येथे अडकून पडतात. पूर नियंत्रण रेषेच्या संदर्भात शासनाचे काही निकष आहे. मात्र भामरागडच्याबाबत हे सारे निकष धाब्यावर ठेवण्यात आले आहे. भामरागड गावाचे पुनर्वसन करून या नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचाही प्रस्ताव दुर्लक्षितच आहे. (तालुका प्रतिनिधी)