पाच वर्षांपासून नियमित मुख्याध्यापक नाही
By Admin | Updated: October 27, 2016 01:46 IST2016-10-27T01:46:41+5:302016-10-27T01:46:41+5:30
स्थानिक पंचायत समितीअंतर्गत लखमापूर बोरी केंद्राअंतर्गत असलेल्या मुरखळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत गेल्या पाच वर्षांपासून नियमित मुख्याध्यापक नाही.

पाच वर्षांपासून नियमित मुख्याध्यापक नाही
शिक्षकांची तीन पदे रिक्त : मुरखळा जि. प. शाळेत शिक्षणाचा बट्ट्याबोळ
चामोर्शी : स्थानिक पंचायत समितीअंतर्गत लखमापूर बोरी केंद्राअंतर्गत असलेल्या मुरखळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत गेल्या पाच वर्षांपासून नियमित मुख्याध्यापक नाही. मुख्याध्यापकांसह पदवीधर शिक्षक व इतर मिळून एकूण शिक्षकांची तीन पदे रिक्त असल्याने या शाळेत शिक्षणाचा पूर्णत: बट्ट्याबोळ झाला आहे.
मुरखळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकूण पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून येथे सर्व वर्गाची मिळून २४४ विद्यार्थी पटसंख्या आहे. सदर शाळेत शिक्षकांची १० पदे मंजूर आहेत. मात्र पदवीधर शिक्षकांचे वर्षभरापासून रिक्त असून मुख्याध्यापक व अन्य एक असे एकूण शिक्षकांचे तीन पदे रिक्त आहेत. सध्या या शाळेत सात शिक्षक कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना विषयनिहाय शिक्षक नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने या शाळेत आणखी तीन शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी व पालकांनी केली आहे.
सदर शाळेचा डोलारा प्रभारी मुख्याध्यापकावर पाच वर्षांपासून सुरू आहे. यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देऊन शैक्षणिक समस्या अवगत करून दिली. मात्र सदर शाळेत नव्या शिक्षकांची नियुक्ती करण्याकडे प्रशासनाने कायम दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये प्रशासनाप्रती नाराजीचा सूर आहे. तत्काळ येथे शिक्षक देण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)