लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीत, कमी पाणी, कमी कालावधीत हमखास नफा मिळवून देणारे पीक म्हणून गवारीकडे पाहिले जात आहे. गवार लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. अनेक शेतकरी गवार पीक लागवडीकडे वळले आहेत. तरीसुद्धा बाजारात गवारचे दर ८० ते १०० रुपये प्रतिकिलो आहेत.
गवारच्या शेंगांमध्ये प्रथिने आणि फायबर समृद्ध प्रमाणात असतात. आहारात गवारीच्या भाजी खाण्याने वजन नियंत्रणात राहते. तसेच, हृदयविकार देखील दूर राहतात. आहारातील गवारीच्या शेंगा आपल्याला अनेक गंभीर आजारांपासून बचावते. बरेच लोक भाजी बनवून, तसेच सलाडमध्ये सामील करून गवारच्या शेंगा खातात. यामध्ये बरेच उपयोगी गुणधर्म आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. गवारच्या शेंगा खाल्ल्याने अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्या दूर होतात. त्यामुळे आहारात गवारीच्या शेंगांचा समावेश करावा, असे तज्ज्ञ सांगतात.
वजन कमी होण्यास मदतसध्याच्या काळात अनेक लोक वाढत्या वजनाच्या समस्येने त्रस्त आहेत. कित्येक तास काम करण्यामुळे आणि सतत वेगवेगळ्या गोष्टी खाल्ल्यामुळे येणारा 'लठ्ठपणा' हा एक गंभीर आजार बनला आहे. जर, वजन वाढण्याबद्दल काळजी वाटत असेल, तर दररोज गवारीच्या शेंगांचे सेवन करावे. हे खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. बरेच लोक हे भाजी किंवा सलाड म्हणून खातात. विशेष म्हणजे गवारची भाजी थंड असल्याचे सांगत अनेकजण खाणे टाळतात.
कमी कालावधी, पाणी कमीगवार पिकाचा कालावधी कमी आहे. सदर पीक कमी पाण्यातही येते. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक पाणी सदर पिकाला देण्याची आवश्यकता भासत नाही.
गर्भवती महिलांसाठी फायदेशीरगवारीची भाजी गर्भवती महिलांसाठीही अत्यंत लाभदायक ठरते. आयर्न आणि कॅल्शिअमची कमतरता पूर्ण करण्यासाठी अनेक गर्भवती महिलांना गवार खाण्याचा सल्ला देण्यात येतो. गवारीमधील फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन्स पोटातील बाळाच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात. ग्रामीण भागात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सदर भाजीची लागवड करतात. त्यामुळे अनेकजण चवीने ही भाजी आहारात वापरतात.
गवारीत व्हिटॅमिन ए, बी, सी; लोह, फॉस्फरसगवारीत व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, आयर्न आणि पोटॅशियम हे उपयुक्त घटक देखील आढळतात.
गवार लहान-मोठ्यांच्या पसंतीची, चवसुद्धा भारीगवारची भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत पसंतीची आहे. लहान मुले ती आवर्जून खातात. तिची चवसुद्धा अतिशय चांगली असते.
गवार हलक्या जमिनीत येतेगवारचे पीक हलक्या जमिनीत येते. जोमात वाढही होते. भरपूर शेंगा लागतात. एकदा शेंगा लगडण्यास सुरुवात झाली की, सदर पिकाचे उत्पन्न भरपूर प्रमाणात निघते.
"मागील पाच वर्षांपासून मी गवार पिकाची लागवड करीत आहे. सदर पिकातून चांगले उत्पादन मिळते. ग्राहकांकडून मागणीसुद्धा चांगली असते."- सुनील ठाकरे, शेतकरी