... तर जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:44 IST2021-02-17T04:44:38+5:302021-02-17T04:44:38+5:30
गडचिरोली : गेल्या दोन महिन्यांपासून सतत कमी होत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता नागरिकांच्या बिनधास्तपणामुळे पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण ...

... तर जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन !
गडचिरोली : गेल्या दोन महिन्यांपासून सतत कमी होत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता नागरिकांच्या बिनधास्तपणामुळे पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येईल, असा सूचक इशारा जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी मंगळवारी घेतलेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत दिला.
राज्याच्या अनेक शहरांत कोरोना रुग्ण पुन्हा वाढत आहेत. ही बाब विचारात घेता जिल्ह्यातही नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे अन्यथा कोरोना रुग्ण वाढू नये म्हणून जिल्ह्यात काही प्रमाणात पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांची बैठक घेतली. नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे, शारीरिक अंतर पाळणे तसेच गर्दी न करणे याबाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी विभागप्रमुखांना दिले.
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली असली तरी काही प्रमाणात पुन्हा रुग्ण वाढताना दिसत आहेत. ही संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी आरोग्य विभागासह पोलीस विभागाने दक्षता बाळगावी, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. नागरिकांनी कोरोनाबाबत शिस्त पाळली नाही तर पुन्हा काही प्रमाणात कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक कार्यक्रम यामध्ये यात्रा, जयंती तसेच लग्न समारंभ या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. अशा वेळी मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे प्रत्येकाला अनिवार्य आहे. त्यामुळे प्रशासनाकडून याबाबत खबरदारी म्हणून पोलीस तसेच आरोग्य विभागाने योग्य ती कारवाई करण्याची सूचना त्यांनी केली. सध्या कोरोना लसीकरण सुरू आहे व रुग्णसंख्याही या महिन्यात कमी झाली. यामुळे नागरिकांनी कोरोनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असल्याचे जाणवत आहे; परंतु राज्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात रुग्ण पुन्हा वाढत असल्यामुळे गडचिरोलीत यापुढे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेऊन कोरोना संसर्ग वाढू न देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या बैठकीला आरोग्य विभागातील अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.
(बॉक्स)
गडचिरोली शहरात वाढताहेत रुग्ण
गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढले आहेत. रविवारी ७, सोमवारी ९ तर मंगळवारी ४ नवीन रुग्णांची नोंद झाली. या तीन दिवसांतील २० रुग्णांपैकी १६ रुग्ण हे गडचिरोली शहर व लगतच्या परिसरातील आहेत. ४ नवीन बाधितांमध्ये शहराच्या कन्नमवार वॉर्ड, कोटगल आणि गणेशनगरातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. याशिवाय एक जण वडसा तालुक्यातील आहे. योग्य खबरदारी न घेतल्यास इतरही तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते.