...तर अख्ख्या गावाला द्यावे लागते मांसाहरी जेवण; पुसेर गावात नियमावली
By संजय तिपाले | Updated: May 5, 2023 19:02 IST2023-05-05T19:01:54+5:302023-05-05T19:02:05+5:30
जिल्हा निर्मितीनंतर अडीच दशकांपासून दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील काही गावांत व्यसनमुक्तीसाठी कडक नियम आहेत.

...तर अख्ख्या गावाला द्यावे लागते मांसाहरी जेवण; पुसेर गावात नियमावली
गडचिरोली: जिल्हा निर्मितीनंतर अडीच दशकांपासून दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील काही गावांत व्यसनमुक्तीसाठी कडक नियम आहेत. चामोर्शी तालुक्यातील पुसेर हे गाव देखील अशाच नियमांमुळे चर्चेत आले आहे. या गावात दारुविक्री करणाऱ्यास पाच हजार रुपये दंड व संपूर्ण गावाला मांसाहरी जेवणाचा दंड केला जातो. आता तर खर्रा पन्नी आढळली तरीही दंडापोटी शंभर रुपये मोजावे लागणार आहेत.
चामोर्शी तालुक्यापासून ४० किमी अंतरावरील पावी मुरांडा या ग्रामपंचायत अंतर्गत पुसेर गावाचा समावेश आहे. जिल्ह्यात बंदी असली तरी ९ वर्षांपूर्वी गावात चोरीछुपे दारु विक्री होत असायची. त्यामुळे घराघरात वादविवाद, मारामाऱ्या होत. महिलांवर कौटुंबिक अत्याचारही वाढले होते. व्यसनात अखंड बुडालेल्या या गावाने दारुबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसभा घेतली व दारू, खर्रा, तंबाखू बंदीचा ठराव केला. दारु विक्री केल्याचे आढळल्यास पाच हजार रुपये दंड व गावाला मांसाहरी जेवण देण्याचा नियम घातला.
अलीकडे तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात खर्राकडे वळत असल्याचे पाहून गावकऱ्यांनी अधिक कडक नियम केला आहे. कोणी खर्रा खाऊन पन्नी फेकल्याचे दिसल्यास शंभर रुपये दंड केला जाणार आहे. मुक्तिपथचे तालुका उपसंघटक आनंद सिडाम,गावपाटील केसरी मट्टामी,उपसरपंच विनोद कोंदामी, ग्रा.पं. सदस्य मधुकर कोवासे यांनी व्यसनमुक्तीबाबत ५ मे रोजी मार्गदर्शन केले. ग्रामसभा अध्यक्ष नामदेव मट्टामी, ग्रामसभा सचिव सुधाकर तुमरेटी आदी उपस्थित होते.
गावातून काढली फेरी
व्यसनमुक्त झालेल्या पुसेर गावाने यापूर्वीच विजयस्तंभ उभारला आहे. ५ मे रोजी गावातून जनजागृती फेरी काढून पुन्हा एकदा व्यसनमुक्तीची हाक दिली आहे. यावेळी पारंपरिक वाद्यवृंदासह निघालेल्या मिरवणुकीत महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.