विमानतळ भूसंपादनाची प्रतीक्षा संपली, विमानतळ केव्हा निर्माण होणार याबाबत नागरिकांमध्ये वाढली उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 16:28 IST2024-12-14T16:26:50+5:302024-12-14T16:28:25+5:30
संस्थांची नियुक्ती : भूसंपादन अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना केले प्राधिकृत

The wait for airport land acquisition is over, curiosity among citizens has increased as to when the airport will be built
गोपाल लाजूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मागील पाच वर्षांपासून रेल्वेमार्गाचे काम 'रुळावर' आले. रेल्वेच्या कामाला प्रत्यक्षात गती मिळाली; परंतु विमानतळ, हवाईपट्टीचे काम जिल्हावासीयांसाठी दिवास्वप्न वाटत होते. अखेर या कामालासुद्धा गती येणार आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवार, १३ डिसेंबर रोजी विमानतळासाठी अंमलबजावणी यंत्रणा व भूसंपादन संस्थांची नियुक्ती केली. शिवाय प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे.
जिल्ह्यात विमानतळ हवाईपट्टी निर्माण करण्याबाबत गत १५ ते २० वर्षांपासून केवळ वावड्या उठविल्या जात होत्या, प्रत्यक्षात मात्र काहीच अंमलबजावणी किंवा काम झालेले नव्हते. दोन- तीन वर्षात विमानतळासाठी केवळ जागा प्रस्तावित झालेली होती. त्यामुळे जिल्ह्यात विमानतळ केव्हा निर्माण होणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता होती.
अखेर ही उत्सुकता संपली असून काही वर्षांतच प्रत्यक्षात विमानतळ साकारले जाणार आहे. शासनाच्या वतीने विमानतळ अंमलबजावणी यंत्रणा व भूसंपादन संस्थांची नियुक्ती झाल्यामुळे जमीन भूसंपादनाच्या कामाला काही महिन्यांतच सुरूवात होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे विमानतळाबाबत असलेले स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल. त्यामुळे जिल्ह्याची कनेक्टिव्हीटी वाढणार असून भूसंपादनाचे दर काय ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मुरखळा- पुलखल भागात होणार विमानतळ
गडचिरोली येथे विमानतळाकरिता तालुक्यातील मुरखळा, पुलखल, कनेरी, मुडझा (बु.), मुडझा (तु.) येथील जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावित केली होती. त्यानुषंगाने नियोजित विमानतळाकरिता अंमलबजावणी यंत्रणा, भूसंपादन संस्था म्हणून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि भूसंपादन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केलेले आहे.
समृद्धी महामार्ग, रेल्वेमार्गाचेही जाळे
जिल्ह्यात पुढील काही वर्षांत समृद्धी महामार्गाचेही जाळे पसरविले जाणार आहेत. याशिवाय जिल्हा मुख्यालयात पोहोचलेला रेल्वेमार्ग छत्तीसगड राज्यापर्यंत विस्तारला जाणार असल्याने जिल्ह्यातील दळणवळणाला वेग येईल. जिल्ह्यात पर्यटनाच्या संधी वाढतील.
२२९.४३ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन
गडचिरोली जिल्हा मुख्यालयात होणाऱ्या नियोजित विमानतळासाठी तालुक्यातील मुरखळा, पुलखल व कनेरी या गावातील अंदाजे २२९.४३ हे. आर. खाजगी व शासकीय जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. सदर जागा हवाईपट्टीसह विविध विकास कामाकरिता भूसंपादित केली जाणार आहे.
जमिनीला सोन्यासारखा भाव; दर पुन्हा वधारणार
- गडचिरोली तालुक्यातील मुरखळा, मुडझा, कनेरी व पुलखल आदी गावांच्या परिसरात विमानतळाची निर्मिती होणार आहे. त्यामुळे या भागातील शेतजमिनीचे दर पुन्हा वधारण्याची शक्यता आहे.
- या भागातील जमिनीला आता सोन्याचा भाव येणार आहे. यापूर्वी २ रष्ट्रीय महामार्गाची निर्मिती झाल्यानंतर या भागातील शेतजमिनीला मोठ्या प्रमाणात भाव आला होता. आता त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.