सामाजिक वनीकरण विभागातर्फे झाडे लावलीत पण आता जिवंत किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:59 IST2025-01-20T16:57:50+5:302025-01-20T16:59:03+5:30

नरोटी येथील प्रकार : ३०% रोपटी नष्ट झाल्याने लागवडीवर प्रश्नचिन्ह

The Social Forestry Department has planted trees, but how many are alive now? | सामाजिक वनीकरण विभागातर्फे झाडे लावलीत पण आता जिवंत किती?

The Social Forestry Department has planted trees, but how many are alive now?

लोकमत न्यूज नेटवर्क 
वडधा:
वडसा वन विभागांतर्गत सामाजिक वनीकरण विभागातर्फे सिर्सी उपक्षेत्रातील नरोटी माल येथे रोजगार हमी योजनेतून दीड महिन्यापूर्वी १ हजार ३०० रोपटी लावण्यात आली. सदर झाडे पावसाळ्यात लावण्याऐवजी हिवाळ्यात लावून नियमांचे उल्लंघन करण्यात आले. आता तर येथील ३० टक्के झाडे नष्ट झालेली आहेत. ७० टक्के झाडांपैकी काही झाडे मरतुकडी झालेली आहेत. सामाजिक वनीकरण विभागाकडून ही मोहीम झाडे लावण्यासाठी राबविली की, निधीची विल्हेवाट लावण्यासाठी, असा सवाल डार्लीसह नरोटी माल येथील शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.


वन विभाग किंवा सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीला वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली जाते. जास्तीत जास्त रोपटी जिवंत राहावीत, हा यामागील उद्देश असतो. परंतु नरोटी येथे एका मोकळ्या जागेवर पावसाळ्यात वृक्ष लागवड न करता दीड महिन्यापूर्वी म्हणजेच हिवाळ्यात १ हजार ३०० रोपट्यांची लागवड करण्यात आली. वृक्ष लागवड करून सामाजिक वनीकरण विभागाने आपली जबाबदारी झटकली.


लागवडीची चौकशी करण्याची मागणी 
ही मोहीम वृक्ष संवर्धनाची नव्हे तर निधी मुरवण्यासाठी राबवलेली, तर नाही ना, असा सवाल नागरिकांचा आहे. येथील वृक्ष लागवडीची चौकशी करावी, अशी मागणी डार्लीसह नरोटी येथील नागरिकांनी केलेली आहे.


वृक्षलागवड कामात बोगस मजूर? 
वडधा परिसरात गत तीन वर्षांपासून सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्ष लागवड केली जात आहे. यात ५० टक्के मजूर प्रत्यक्ष काम करणारे तर ५० टक्के मजूर कामावर न येता त्यांच्या नावाने बँक खात्यात पैसा जमा करून निधी लाटला जातो. मजुरांकडून पैसा वनीकरणचे कर्मचारी मागून घेतात, असा आरोप आहे.
 

Web Title: The Social Forestry Department has planted trees, but how many are alive now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.