पीक कर्ज भरण्याची लगबग वाढली; बँकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:24 IST2025-03-19T16:22:06+5:302025-03-19T16:24:02+5:30
Gadchiroli : व्याजमाफीसाठी धडपड सुरू; एप्रिल महिन्यापासून मिळते नवीन कर्ज

The rush to pay crop loans has increased; farmers flock to banks
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मार्च महिना संपण्यास केवळ १३ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखांमध्ये कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी उसळत आहे.
शेतीच्या खर्चासाठी शेतकऱ्याला सरकार मार्फत अगदी शून्य टक्के व्याजदराने कर्जाचा पुरवठा केला जातो. मात्र त्यासाठी शेतकऱ्याने पीक कर्ज ३१ मार्चपूर्वी भरणे आवश्यक आहे. पीक कर्जाचा पैसा जवळपास नऊ महिने वापरता येत असल्याने पीक कर्ज घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमार्फत कर्ज वितरण केले जाते. यात सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा सहकारी बँकेमार्फत होते. खरिपातील धान नोव्हेंबर महिन्यात निघते. डिसेंबर महिन्यापासून शेतकरी भावाचा अंदाज बघून धानाची विक्री करतात. फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी कर्ज भरत असतात. १७ मार्चपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ६१.६४ टक्के कर्ज परतफेड करण्यात आली आहे.
३१ मार्चपर्यंत भरले तरच होणार व्याज माफ
- शासनाकडून टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना दिले पीक शून्य कर्ज जाते. मात्र त्यासाठी अट म्हणजे संबधित शेतकऱ्याने कर्जाची परतफेड ३१ मार्चपूर्वी करणे आवश्यक आहे.
- जवळपास नऊ महिने कर्ज वापरता येत असल्याने बहुतांश शेतकरी ३१ मार्चपूर्वी कर्जाची परतफेड करतात. शेवटच्या आठ दिवसांमध्ये सर्वाधिक कर्जाची परतफेड होते.
बचत गटाच्या तुलनेत फायदेशीर
एप्रिलमध्ये उचलले कर्ज थेट मार्च महिन्यात भरले जाते. जवळपास १० ते ११ महिने शेतकरी बिनव्याजी पैसे वापरू शकते. त्यामुळे अनेक शेतकरी पीककर्जाची उचल करून नियमितपणे भरणा करतात. बचत गटाच्या तुलनेत पीककर्ज शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे. शेतकऱ्यांनी पीककर्ज उचलावे.
सर्वाधिक कर्ज वितरण सहकारी बँकेमार्फत
सेवा सहकारी संस्था व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांशी जोडली आहे. तसेच ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांचे बँक खाते सहकारी बँकांच्या शाखेत आहेत. त्यामुळे नागरिकांना या बँकेबाबत आपुलकी वाटत असल्याने सर्वाधिक शेतकरी सहकारी बँकेतूनच कर्जाची उचल करतात.
तालुकानिहाय कर्ज वितरण व वसुली (आकडे कोटीत)
तालुका वाटप वसुली टक्के
कोरची ५.९५ ३.७० ६२.२७
कुरखेडा १५.४२ ८.९० ५७.७४
देसाईगंज ४.३६ २.९१ ६६.६९
आरमोरी १२.९२ ८.२० ६३.४८
गडचिरोली १०.४६ ७.२० ६८.८४
धानोरा ९.६६ ६.२० ६४.१९
चामोर्शी ३३.४९ २१.०२ ६२.७६
अहेरी ८.३३ ४.४० ५२.८२
मुलचेरा ४.१४ २.१२ ५१.२०
भामरागड २.१८ १.४१ ६४.४८
एटापल्ली ४.६९ २.८१ ५९.७३
सिरोंचा ५.३२ ३.२० ६०.११
एकूण ११६.९३ ७२.०७ ६१.६४
२३ हजार ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज व्याजमुक्त
शेतकऱ्यांना खरीप हंगामात सुमारे ११६ कोटी २२ लाख रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. त्यापैकी १४ हजार ४६ सदस्यांनी कर्ज भरले आहे.
"शून्य टक्के व्याज दराचा लाभघेण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी पीक कर्जाचा भरणा करावा. एप्रिल महिन्यात पुन्हा नवीन खरीप हंगामाचे कर्ज वितरण केले जाते. १७ मार्चपर्यंत ६१.६४ टक्के कर्जवसुली झाली आहे. ३१ मार्चपूर्वीपर्यंत २५ टक्क्यांच्यावर कर्जवसुली होईल, असा अंदाज आहे."
- सतीश आयलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक, गडचिरोली