'हिडमा-भीमा' जोडीच्या दहशतीचा अध्याय संपुष्टात ! एकाचे एन्काउंटर, दुसऱ्याने केले आत्मसमर्पण
By संजय तिपाले | Updated: December 11, 2025 18:50 IST2025-12-11T18:47:02+5:302025-12-11T18:50:56+5:30
Gadchiroli : दंडकारण्यात दोन दशकांहून अधिक काळ सुरक्षा दलांवर सापळे रचून हल्ले करत रक्तरंजीत कारवाया घडवून आणणाऱ्या दोन कुख्यात माओवादी जोडगोळीच्या दहशतीचा अध्याय अखेर संपुष्टात आला.

The chapter of terror of the 'Hidma-Bhima' duo ends! One of them was in an encounter, the other surrendered
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दंडकारण्यात दोन दशकांहून अधिक काळ सुरक्षा दलांवर सापळे रचून हल्ले करत रक्तरंजीत कारवाया घडवून आणणाऱ्या दोन कुख्यात माओवादी जोडगोळीच्या दहशतीचा अध्याय अखेर संपुष्टात आला. १५ नोव्हेंबरला माओवाद्यांच्या बटालियन क्र. १ चा टॉप कमांडर व माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य माडवी हिडमा याचा चकमकीत खात्मा झाला तर १० डिसेंबरला त्याचा एकेकाळचा साथीदार व बटालियन क्र. १ चा तत्कालीन उपकमांडर भीमा ऊर्फ सितू ऊर्फ किरण कोवासी (वय ४६) याने गडचिरोली पोलिसांपुढे शस्त्र ठेवले.
पाचशेपेक्षा अधिक जवानांच्या मृत्यूचा मास्टरमाइंड व जहाल कमांडर माडवी हिडमा व उपकमांडर भीमा ऊर्फ सितू ऊर्फ किरण कोवासी या जोडगोळीने दंडकारण्यात जरब निर्माण केली होती. २०२० ते २०१९ पर्यंत माओवाद्यांच्या सर्वात घातक समजल्या जाणाऱ्या बटालियन क्र. १च्या कमांडरपदाची धुरा हिडमाकडे होती, तर उपकमांडर म्हणून भीमा कोवासी याची त्याला साथ होती.
भीमा कोवासी हा मूळचा छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्याच्या कोंटा तालुक्यातील चिंतागुफा गावचा रहिवासी आहे. १९९८ मध्ये जगरगुंडा दलममधून त्याने चळवळीत प्रवेश केला. माड, पश्चिम बस्तर, आंध्र व ओडिशा सीमावर्ती भाग अशा कोअर एरियामध्ये तो सक्रिय होता. २०१० मध्ये तो बस्तर एरियातील बटालियन क्र. १ मध्ये तो दाखल झाला. या जोडीने नऊ वर्षात अनेक हिंसक कारवाया करून सुरक्षा दलांना आव्हान दिले. २०१९ मध्ये हिडमा व भीमा यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. हिडमा बटालियन क्र. १ चा कमांडर म्हणून कायम राहिला तर भीमा कोवासीकडे पश्चिम बस्तर डिव्हिजनची जबाबदारी देण्यात आली. हिडमा ठार झाल्यानंतर त्याचा एकेकाळचा साथीदार भीमा कोवासी अस्वस्थ होता. महिनाभराच्या आतच त्याने पत्नी पोरीये ऊर्फ लक्की गोटा हिच्यासह पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर शरणागती पत्करली.