गडचिरोली पोलिसांचे शौर्य देशात ‎चमकले; ३१ जणांना राष्ट्रपती पदक

By गेापाल लाजुरकर | Updated: January 25, 2026 22:15 IST2026-01-25T22:14:51+5:302026-01-25T22:15:17+5:30

२०१८ मध्ये गाजलेल्या बोरिया-कसनासूर चकमकीतील ऐतिहासिक शौर्यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे. याशिवाय ३९४ अंमलदारांना पदोन्नतीची बक्षिसीही मिळाली आहे.

The bravery of Gadchiroli police shines in the country; 31 people awarded President's Medal | गडचिरोली पोलिसांचे शौर्य देशात ‎चमकले; ३१ जणांना राष्ट्रपती पदक

गडचिरोली पोलिसांचे शौर्य देशात ‎चमकले; ३१ जणांना राष्ट्रपती पदक

गाेपाल लाजूरकर, गडचिराेली

‎‎गडचिरोली : माओवाद्यांविरुद्धच्या लढ्यात जिवाची बाजी लावून अतुलनीय धाडस दाखविणाऱ्या जिल्हा पोलिस दलातील ३१ अधिकारी व जवानांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे ‘पोलिस शौर्य पदक’ जाहीर झाले. २०१८ मध्ये गाजलेल्या बोरिया-कसनासूर चकमकीतील ऐतिहासिक शौर्यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे. याशिवाय ३९४ अंमलदारांना पदोन्नतीची बक्षिसीही मिळाली आहे.

‎भामरागड तालुक्यातील बोरिया- कसनासूरच्या घनदाट जंगलात ‎२२ एप्रिल २०१८ रोजी सी-६० पथकाने ऐतिहासिक कामगिरी करत ४० माओवाद्यांना कंठस्नान घातले होते. या थरारक मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या जवानांच्या शौर्यावर आता राष्ट्रपतींची मोहोर उमटली आहे. विशेष म्हणजे, मागील पाच वर्षांत गडचिरोली पोलिसांनी तब्बल २१७ शौर्य पदके पटकावून देशात आपला दबदबा निर्माण केला आहे. यामुळे जिल्हा पोलिस दलाची मान अभिमानाने उंचावली आहे.
‎पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक एम. रमेश, कार्तिक मधिरा आणि गोकुल राज जी. यांनी सर्व पदक विजेत्यांचे स्वागत केले आहे.

‎यांनी पटकावले शौर्यपदक...
‎पोलिस निरीक्षक अमोल फडतरे, उपनिरीक्षक मधुकर नैताम, वासुदेव मडावी, सहायक उपनिरीक्षक विलास पोरतेट, हवालदार संतोष नैताम, विश्वनाथ सडमेक, ज्ञानेश्वर तोरे, दिलीप सडमेक, रामसू नरोटे, आनंदराव उसेंडी, राजू चव्हाण, मोहन उसेंडी, संदीप वसाके, पो. ना. अरुण मेश्राम, सुधाकर वेलादी, नितेश वेलादी, विश्वनाथ मडावी, कैलास कोवासे, हरिदास कुलयेटी, किशोर तलांडे, अतुल मडावी, अनिल आलाम, नरेंद्र मडावी, आकाश ऊईके, घिस्सू आत्राम, राजू पुसाली, महेश जाकेवार, रुपेश कोडापे, मुकेश सडमेक, योगेंद्रराव सडमेक व अंमलदार कारे आत्राम यांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक जाहीर झाले.

‎शहीद जवानांचा मरणोत्तर गौरव
‎कर्तव्य बजावताना बलिदान देणाऱ्या १० शहीद अंमलदारांना प्रशासनाकडून मरणोत्तर पदोन्नती जाहीर करण्यात आली आहे. यात ७ शहीद हवालदारांना सहायक उपनिरीक्षक, तर ७ शहीद पोलिस नाईक यांना हवालदारपदी बढती देण्यात आली. एकूण ३९४ पदोन्नतींमध्ये १० जणांना त्यांच्या विशेष कामगिरीसाठी ‘वेगवर्धित’ पदोन्नती देण्यात आली आहे.

Web Title: The bravery of Gadchiroli police shines in the country; 31 people awarded President's Medal