तेंदूपत्ता संकलनाकडे कंत्राटदारांनी फिरविली पाठ
By Admin | Updated: March 12, 2015 02:03 IST2015-03-12T02:03:53+5:302015-03-12T02:03:53+5:30
जिल्ह्यातील एकूण ४३ युनिटमधून तेंदूपत्ता संकलनासाठी वन विभागाने लिलाव प्रक्रिया राबविली होती. मात्र लिलावाची तिसरी फेरी...

तेंदूपत्ता संकलनाकडे कंत्राटदारांनी फिरविली पाठ
गडचिरोली : जिल्ह्यातील एकूण ४३ युनिटमधून तेंदूपत्ता संकलनासाठी वन विभागाने लिलाव प्रक्रिया राबविली होती. मात्र लिलावाची तिसरी फेरी आटोपूनही केवळ सहा युनिटचा लिलाव झाला आहे. तेंदूपत्ता संकलनाचा कालावधी जवळ येत असतानाही विक्री न झाल्याने तेंदूपत्ता संकलन अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील तेंदूपत्ता संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे गुजरात, उत्तरप्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आदी राज्यांमधील व्यापारी गडचिरोली येथे येऊन तेंदूपत्ता खरेदी करतात. तेंदूपत्त्याच्या माध्यमातून गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, छत्तीसगड व तेलंगणा राज्यातील नागरिकांना रोजगार प्राप्त होतो.
पेसा कायद्यातून वगळलेल्या गावांमध्ये वन विभागाच्यामार्फतीने तेंदूपत्ता संकलन करण्यात येते. अशा प्रकारचे ४३ युनिट आहेत. या युनिटमध्ये तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे वन विभागाने यावर्षीही तेंदू युनिट विक्रीसाठी लिलाव प्रक्रिया राबविली होती. लिलावाच्या तीन फेऱ्यांमध्ये कर्कापल्ली, सावेला, लवेझरी, मुरमुरी व आरमोरी या सहा युनिटची विक्री झाली आहे. उर्वरित ३७ युनिटला वन विभागाच्या नियमांप्रमाणे किंमत प्राप्त झाली नाही. त्यामुळे या युनिटचा लिलाव रखडला आहे.
लिलावासाठी चवथी फेरी राबवायची किंवा नाही. त्याचबरोबर कंत्राटदारांनी बोली लावलेल्या किंमतीला युनिट द्यायचे की नाही, याबाबत फेरविचार करण्यासाठी शासनाकडून निर्देश मागविले जाणार आहेत. यावर्षी पहिल्यांदाच तेंदूपत्ता युनिट विक्रीला कंत्राटदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने वन विभागाचे कर्मचारी सुद्धा आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
तेंदूपत्ता संकलनाला एप्रिल महिन्याच्या शेवटपासून सुरुवात होते. तेंदूपत्त्याचा युनिट खरेदी केल्यानंतर कंत्राटदारांकडून तेंदूपत्ता जास्त यावा, यासाठी विशेष उपाययोजना केल्या जातात. मात्र मार्च महिन्याला सुरुवात होऊनही तेंदूपत्ता युनिटची विक्री झाली नाही. त्यामुळे तेंदूपत्ता संकलन अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तेंदूपत्ता युनिट विक्रीस जसजसा विलंब होईल, तसतशी किंमत कमी येईल, अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. कंत्राटदाराच्या उदासीनतेमुळे तेंदूपत्ता संकलनाच्या रोजगारावर परिणाम होणार आहे. (नगर प्रतिनिधी)