सोयाबीनकडे पाठ, कापसाला पसंती
By Admin | Updated: July 7, 2017 01:18 IST2017-07-07T01:18:16+5:302017-07-07T01:18:16+5:30
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाकडे पाठ फिरवित कापूस पिकाच्या लागवडीला पसंती दर्शविली

सोयाबीनकडे पाठ, कापसाला पसंती
क्षेत्र घटले : कृषी विभागाचा खरीप हंगाम पेरणी अहवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाकडे पाठ फिरवित कापूस पिकाच्या लागवडीला पसंती दर्शविली असल्याचे कृषी विभागाच्या पीक पेरणी अहवालावरून स्पष्ट होत आहे. ४ जुलैच्या पीक पेरणी अहवालात केवळ ११ हेक्टरवर सोयाबीन तर ३०३ हेक्टरवर कापूस पिकाची लागवड झाली असल्याची नोंद केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र धान पिकासाठी मोठ्या प्रमाणात जल सिंचनाची गरज भासते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे जल सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, असे शेतकरी वावरात प्रामुख्याने सोयाबिन पिकाची लागवड करीत होते. १० वर्षांपूर्वी जवळपास पाच हजार हेक्टरवर सोयाबिन पिकाची लागवड केली जात होती. मात्र दरवर्षीच सोयाबिन पिकाने शेतकऱ्यांना धोका देण्यास सुरूवात केली. कधी गवतामुळे तर कधी अतिपावसामुळे सोयाबिनला पाहिजे तेवढ्या प्रमाणात शेंगा लागत नसल्याने दरवर्षीच तोट्याचा सामना करावा लागत होता. परिणामी दरवर्षी सोयाबिन मागील क्षेत्र घटत गेले. मागील वर्षी केवळ ३०० ते ४०० हेक्टरवर सोयाबिन पिकाची लागवड झाली होती. यावर्षी मात्र केवळ ११ हेक्टरवर सोयाबिन पीक लावले असल्याची नोंद कृषी विभागाने केली आहे.
सोयाबिन खालील क्षेत्रावर आता कापूस पिकाची लागवड केली जात आहे. कापूस पिकाला मिळणारा सर्वसाधारणपणे चांगला भाव व निश्चित उत्पादन यामुळे शेतकरी कापूस पिकाकडे वळला आहे. नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यात तसेच तेलंगणा राज्यात कापूस पिकाची लागवड केली जाते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना कापूस पिकाच्या लागवडीविषयी थोडीफार माहिती आहे. गावातील काही नागरिक कापूस पिकाची लागवड करीत असल्याने त्यांच्याही अनुभवाचा फायदा कापूस लागवडीसाठी होत आहे. नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यातील व्यापारी कापूस खरेदीसाठी गावातच येत असल्याने कापूस विकण्याची अडचणही दूर झाली आहे. परिणामी शेतकरी कापसाकडे वळला असल्याचे दिसून येत आहे. ४ जुलैपर्यंत ३०३ हेक्टरवर कापूस पिकाची लागवड केली असल्याचे कृषी विभागाने म्हटले असले तरी प्रत्यक्षात चार हजार पेक्षा अधिक हेक्टरवर कापूस पिकाची लागवड झाली आहे. प्रामुख्याने सिरोंचा, अहेरी, चामोर्शी या तालुक्यांमध्ये कापूस पीक लावले जाते.
रबी हंगामात उन्हाळी सोयाबिनची लागवड केली जात होती. आता त्याऐवजी मका, उडीद, मूग, सूर्यफूल आदी पिकांची लागवड केली जात असल्याचे दिसून येत आहे.
११ हजार हेक्टरवर आवत्या
४जिल्ह्यात धान पिकाची लागवड रोवणे व आवत्या या दोन पद्धतीने केली जाते. रोवणीच्या तुलनेत आवत्याचा खर्च कमी आहे. मात्र उत्पादन कमी होते. त्यामुळे बहुतांश शेतकरी धानाचे पऱ्हे टाकून रोवणी करतात. ५ हजार २११ हेक्टरवर धानाचे पऱ्हे टाकले असल्याची नोंद झाली आहे. मात्र प्रत्यक्षात १० हजार पेक्षा अधिक हेक्टरवर पऱ्हे टाकले आहेत. ११ हजार हेक्टरवर आवत्याची लागवड झाली आहे. आदिवासीबहुल भागातील शेतकरी खर्च कमी करण्यासाठी आवत्या पद्धतीने धानाची लागवड करतात. प्रामुख्याने भामरागड, एटापल्ली, सिरोंचा या भागातील शेतकरी आवत्या टाकतात.
१ हजार ६९२ हेक्टरवर तूर
४२०१६ यावर्षी देशभरात तूर डाळीचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे तूर डाळीच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढल्या होत्या. त्यानंतर बहुतांश शेतकरी तूर उत्पादनाकडे वळले. मागच्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन झाले. त्यामुळे तुरीचे भाव गडगडले. काही जिल्ह्यांमध्ये तर अजुनही तूर विकल्या गेली नाही. यावर्षीही चांगला भाव मिळेल, या उद्देशाने शेतकऱ्यांनी तूर पिकाची लागवड केली आहे. सर्वाधिक तूर पिकाची लागवड देसाईगंज तालुक्यात ७०९ हेक्टरवर झाली आहे. त्यानंतर गडचिरोली, आरमोरी तालुक्यांचा समावेश आहे. कमी खर्चात येणारे पीक म्हणून या पिकाची ओळख आहे.