दहावी-बारावीच्या काेऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बाेजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:37 IST2021-04-21T04:37:04+5:302021-04-21T04:37:04+5:30

गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी व बारावीच्या बाेर्डाच्या परीक्षा राज्य शासनाने पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा शाळास्तरावर ...

Tenth-twelfth grade answer sheets are available in schools | दहावी-बारावीच्या काेऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बाेजा

दहावी-बारावीच्या काेऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बाेजा

गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी व बारावीच्या बाेर्डाच्या परीक्षा राज्य शासनाने पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा शाळास्तरावर हाेणार आहेत. मात्र १५ दिवसांपूर्वीच नागपूर बाेर्डातून उत्तरपत्रिका व तत्सम साहित्य केंद्र असलेल्या शाळांच्या ठिकाणी पाेहाेचविण्यात आले आहे. परीक्षांच्या तारखा अजून ठरल्या नाही. मात्र काेऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर भार वाढला आहे. मुख्याध्यापकांना उत्तरपत्रिकांकडे बारकाईने लक्ष ठेवावे लागत आहे.

गडचिराेली जिल्ह्यात यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात इयत्ता बारावीला जवळपास १२ हजार २६० परीक्षार्थी विद्यार्थी आहेत. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या जिल्हाभरात १५ हजार १४५ आहे. काेराेना संसर्गामुळे प्रत्यक्ष वर्ग भरविणे बंद आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार कर्तव्य बजावण्याचे आदेश आहेत. मात्र मुख्याध्यापक व लिपिकांना कामासाठी दरराेज शाळेत जावे लागत आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा नेमक्या केव्हा हाेणार, असा प्रश्न प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांना पडला आहे. शिवाय तारखा केव्हा जाहीर हाेणार, अशी विचारणा पालक व विद्यार्थी करीत आहेत.

बाॅक्स...

हे साहित्य आहे कस्टडीत

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेच्या वतीने इयत्ता दहावी, बारावीची बाेर्डाची परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षा मंडळाचे विभागीय कार्यालये नागपूरला आहे. नागपूर बाेर्डातून काेऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, मॅप, ग्राफ, स्टिकर व तत्सम साहित्य परीक्षा केंद्र असलेल्या शाळांमध्ये पुरविण्यात आल्या. संबंधित शाळांच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांच्या कस्टडीत परीक्षेचे हे सर्व साहित्य ठेवण्यात आले आहेत. या साहित्याची देखभाल करण्यासाेबतच नियंत्रण ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांवर साेपविली आहे.

बाॅक्स...

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चितता

- दरवर्षी इयत्ता बारावीची परीक्षा फेब्रुवारी अखेरीसपासून तर दहावीची परीक्षा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू हाेत हाेती.

- यावर्षी काेराेनामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही तारखा निश्चित न झाल्याने विद्यार्थी चिंताग्रस्त झाले आहेत. परीक्षा केव्हा हाेणार, असा प्रश्न आहे.

- बाेर्डाची परीक्षा आटाेपल्याशिवाय दहावी व बारावीचे विद्यार्थी तणावमुक्त हाेत नाही. आधीच काेराेना परिस्थितीने विद्यार्थी हैराण झाले. त्यात परीक्षेच्या तारखा अजूनही ठरल्या नाही. परीक्षा केंद्रावर हाेणार की शिक्षण घेत असलेल्या शाळेत हाेणार, हेही अनिश्चित आहे. एकूणच परीक्षा लांबल्यामुळे दहावी-बारावीचे विद्यार्थी ताणतणावात आहेत.

काेट...

शाळेमध्ये ठेवण्यात आलेल्या उत्तरपत्रिका व तत्सम साहित्य खराब हाेऊ नये, त्यांना उधळी लागू नये, याची संपूर्ण खबरदारी घेतली जात आहे. शाळा प्रशासनासह परीक्षेच्या साहित्यांवर पूर्णपणे लक्ष आहे.

- हेमंत रामटेके, प्राचार्य, शिवाजी हायस्कूल

..............

आमच्या शाळेत इयत्ता दहावी व बारावीच्या काेऱ्या उत्तरपत्रिका पाेहाेचल्या आहेत. जाेपर्यंत नागपूर बाेर्डाकडून काही सूचना येत नाही, ताेपर्यंत या उत्तरपत्रिका सुरक्षित ठेवणे आमची जबाबदारी आहे.

- सागर म्हशाखेत्री, प्राचार्य, कमलताई मुनघाटे, हायस्कूल

.........................

आमच्या शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून दहावी, बारावीचे परीक्षा केंद्र आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी प्राप्त झालेल्या उत्तरपत्रिका व साहित्यांकडे पूर्ण लक्ष ठेवले जात आहे. दरराेज शाळेत जाऊन उत्तरपत्रिकांच्या नियंत्रणासाेबतच भाैतिक सुविधांकडे लक्ष दिले जात आहे.

- सुनील चंदनगिरीवार, प्राचार्य, जि.प.हायस्कूल

Web Title: Tenth-twelfth grade answer sheets are available in schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.