दागिण्यांसाठी भाडेकरूने केला महिला अधिकाऱ्याचा खून
By दिगांबर जवादे | Updated: April 18, 2025 16:35 IST2025-04-18T16:31:46+5:302025-04-18T16:35:54+5:30
पुणे येथून घेतले ताब्यात : नवेगाव येथील प्रकरण

Tenant kills female officer for jewellery
दिगांबर जवादे
गडचिराेली : नवेगाव येथील सेवानिवृत्त अधिकारी कल्पना उंदीरवाडे यांचा १३ एप्रिल राेजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास खून झाला. गडचिराेली पाेलिसांनी आराेपी विशाल ईश्वर वाळके (४५, रा. मुरखळा चक, ता. चामोर्शी) याला पुणे येथून माेठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. विशाल हा उंदीरवाडे यांच्या घरी भाड्याने राहत हाेता. उंदीरवाडे यांच्या अंगावर असलेले दागिने हिसकावण्यासाठी त्याने हाताेड्याने डाेक्यावर मारून उंदीरवाडे यांचा खून केला.
रविवारी सकाळपर्यंत सर्व व्यवस्थित असताना दुपारच्या सुमारास कल्पना उंदीरवाडे यांचा घरी अचानक मृतदेह आढळून आला. त्यांच्या डाेक्यावर मार लागल्याच्या खुणा दिसून आल्या. काेणासाेबतही भांडण झालेले नसताना अचानक त्यांना काेणी मारले असावे, असा प्रश्न निर्माण झाला. उंदीरवाडे यांचा अंत्यविधी पार पडल्यानंतर पाेलिसांनी चाैकशीला सुरुवात केली. उंदीरवाडे यांच्या वरच्या मजल्यावर तीन भाडेकरू व तळमजल्यावर विशाल वाळके राहत हाेता. खून हाेण्याच्या पूर्वीपर्यंत ताे घरी हाेता. मात्र, खून झाल्यानंतर ताे अचानक गायब झाला. ही बाब पाेलिसांना खटकली. त्याला फाेन केले असता त्याचा फाेन कधी बंद, तर कधी सुरू राहत हाेता. त्यामुळे पाेलिसांचा संशय त्याच्यावर बळावला. तसेच ताे वेळाेवेळी शहर बदलत असल्याने त्याला ताब्यात घेण्यास अडचणी निर्माण हाेत हाेत्या. अखेर पुणे पाेलिसांच्या मदतीने गडचिराेली पाेलिसांनी आराेपी विशालला शिवाजीनगर (पुणे) येथून ताब्यात घेतले व गडचिराेलीला आणले.
यांनी केले काम फत्ते
पोलिस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप, पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगणजुडे यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे एपीआय डुलत, एपीआय राहुल आव्हाड, गडचिरोली पाेलिस स्टेशनचे एपीआय विजय चव्हाण, पीएसआय दीपक चव्हाण, पीएसआय विशाखा म्हेत्रे व डीबी पथकातील पाेलिस कर्मचाऱ्यांनी आराेपीला ताब्यात घेण्यास परिश्रम घेतले.
दाेन वर्षांपासून राहत हाेता भाड्याने
आराेपी विशाल वाळके हा कल्पना उंदीरवाडे यांच्या घरी दाेन वर्षांपासून भाड्याने राहत हाेता. पत्नी माहेरी निघून गेली हाेती. त्यामुळे ताे आई व मुलासह राहत हाेता. घटनेच्या काही दिवसांपूर्वी त्याने मुलगा व आईला गावी नेऊन सोडले हाेते. दुसऱ्यांचे पैसे द्यायचे हाेते. कल्पना उंदीरवाडे यांच्याकडील दागिने विकून कर्ज फेडायचे असा बेत त्याने आखला हाेता.