चामोर्शी तालुक्यातील दहा हजार शेतकरी बोनसपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:40 IST2021-05-25T04:40:57+5:302021-05-25T04:40:57+5:30
यावर्षी धान खरेदी प्रक्रिया फार गुंतागुंतीची होती. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपले धान विकले व प्रति क्विंटलमागे मिळणारा ७०० रुपये ...

चामोर्शी तालुक्यातील दहा हजार शेतकरी बोनसपासून वंचित
यावर्षी धान खरेदी प्रक्रिया फार गुंतागुंतीची होती. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपले धान विकले व प्रति क्विंटलमागे मिळणारा ७०० रुपये बोनस मिळेल या आशेने गेल्या दोन महिन्यांपासून आहेत. गतवर्षी या कालावधीत शेतकऱ्यांना बोनस मिळाले होते, त्यामुळे खरीप हंगामातील बी बियाणे, तसेच लागवड खर्च करण्यासाठी थोडीफार मदत झाली होती. यावर्षी खरीप हंगाम तोंडावर आला असताना अजूनही बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. दरवर्षी शेतकरी खरीप हंगामात सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून बँकांकडून कर्ज घेत असतात व ते परतफेडसुद्धा करतात; मात्र यावर्षी ऐन धान परिपक्व होण्याच्या मार्गावर असताना पीक रोगाच्या स्वाधीन झाले, तसेच उरलेले पीक बांधणी व कापणी करताना पावसामुळे धान शेतातच भिजवून गेले, त्यामुळे धानाला अपेक्षित भावसुद्धा मिळाला नाही. केवळ ५० टक्के उत्पादनावर वर्षभराचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असताना कोरोना महामारी संकट आल्याने कोणतेही काम मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पदरी असलेल्या पैशातून गेले दोन महिन्यांपासून दैनंदिन खर्च करावा लागत आहे. खरीप हंगाम सुरू होण्याअगोदर बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी सहारे व भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.