शिक्षकांच्या नियुक्त्या धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2017 01:08 IST2017-07-03T01:08:56+5:302017-07-03T01:08:56+5:30
जिल्हा परिषदेअंतर्गत मार्चमध्ये विषय शिक्षकांच्या पदभरती संदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात

शिक्षकांच्या नियुक्त्या धोक्यात
उच्च न्यायालयाचा निर्णय : पुन्हा याचिका दाखल करण्याची मुभा
ंलोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा परिषदेअंतर्गत मार्चमध्ये विषय शिक्षकांच्या पदभरती संदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात विज्ञान पदवीधरांच्या याचिकेवर ३० जून रोजी सुनावणी झाली. विषय शिक्षकांच्या पदभरतीमध्ये बारावी पास विज्ञान शिक्षकांना नियुक्ती दिल्यास याचिकाकर्त्यांना परत न्यायालयात जाण्याची मुभा राहील, असा निर्णय न्यायमूर्तीद्वय बी. पी. धर्माधिकारी व रोहीत देव यांनी दिला आहे. त्यामुळे बारावी पास विज्ञान शिक्षकांच्या नियुक्त्या धोक्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेने २० व २१ मार्च रोजी ३६९ विषय शिक्षक पदावर नियुक्ती देताना विज्ञान व गणित या विषय शिक्षकांच्या यादीमध्ये पदवीधर शिक्षकांना डावलून बारावी विज्ञान डीएड् शिक्षकांना स्थान देण्यात आले. त्यामुळे विनोद शिवाजी रायपुरे व इतर सहा शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. याची सुनावणी ३० जून रोजी झाली. बारावी विज्ञान शिक्षकांना नियुक्ती आदेश दिल्याचे पुरावे सादर करण्यास न्यायालयाने सांगितले. मात्र संबंधित शिक्षकांना आदेशपत्रच दिले गेले नसल्याने याचिकाकर्त्यांना पुरावे सादर करता आले नाही. त्यामुळे न्यायालयाने याचिका निकालात काढली आहे. मात्र विज्ञान विषयात पदवीधर नसलेल्या शिक्षकांना प्रत्यक्ष नियुक्ती दिल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्याची मुभा दिली आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेने गणित व विज्ञान या विषयांसाठी बारावी उत्तीर्ण शिक्षकांची नियुक्ती केल्यास या नियुक्त्या धोक्यात येण्याची शक्यता आहे. शिक्षण विभाग नेमका कोणता निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.