शिक्षक पात्रता परीक्षेचे पडघम वाजले

By Admin | Updated: October 5, 2014 23:04 IST2014-10-05T23:04:30+5:302014-10-05T23:04:30+5:30

गतवर्षी १५ डिसेंबर २०१३ रोजी गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर तब्बल तीन महिन्याचा कालावधीने या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता.

The teacher's eligibility exam was a downpour | शिक्षक पात्रता परीक्षेचे पडघम वाजले

शिक्षक पात्रता परीक्षेचे पडघम वाजले

गडचिरोली : गतवर्षी १५ डिसेंबर २०१३ रोजी गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर तब्बल तीन महिन्याचा कालावधीने या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्यातील पात्र भावी शिक्षकांची संख्या फारच कमी होती. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर पसरला होता. गतवर्षी प्रमाणे यंदाही शिक्षक पात्रता परीक्षेचे पडघम वाजले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी या परीक्षेचा निकाल फारच कमी लागल्याने यंदा पात्र होण्यासाठी गुणांची अट शिथील करण्यात आली आहे.
गतवर्षी राज्यशासनाने राज्यभरातील सर्व भावी शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या परीक्षेचा नियोजित कार्यक्रम जाहीर करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या हजारो डीएड्, बीएड्धारक उमेदवारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र सदर परीक्षेचा निकाल जाहीर होऊन सहा महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र गतवर्षीच्या शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोकरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पात्र ठरलेल्या भावी शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. शासनाने शिक्षक भरती न करताच पुन्हा यंदाही शिक्षक पात्रता परीक्षेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
यंदा प्राथमिक शिक्षकांना पात्रता परीक्षेच्या अटीमध्ये शिथीलता ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षकांची संख्या यंदा वाढणार आहे. १३ फेब्रुवारी २०१३ नंतर सेवेत रूजू झालेल्या इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या कार्यरत शिक्षकांनाही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. या परीक्षेत खुल्या उमेदवारांना ५० गुणांची तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५ गुणांची अट शिथील करण्यात आली आहे. शिक्षणाच्या अधिकार अधिनियमानुसार वर्ग १ ली ते ५ वी, वर्ग ६ वी ते ८ वीला अध्यापन करणाऱ्या इच्छुक शिक्षण सेवक उमेदवाराला शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. सदर शिक्षक पात्रता परीक्षा १४ डिसेंबर २०१४ रोजी घेण्यात येणार आहे. यंदा प्रथमच या परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात काही तालुक्यात स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. यापूर्वी केवळ जिल्हास्तरावरच टीईटी परीक्षेसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा होती. यंदा पदवीच्या अंतिम वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही. या परीक्षेसाठी २७ सप्टेंबरपासून आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे. ‘आॅफलाईन हार्ड कॉपी’ स्वरूपात अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तालुकानिहाय अर्ज संकलन केंद्र सुरू करण्यात येत असल्याने तालुकास्तरावरील ग्रामीण तसेच दुर्गम उमेदवारांना सोयीचे होणार आहे. तालुकास्तरावर २० आॅक्टोबरपर्यंत टीईटी परीक्षेचे अर्ज स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर तालुकास्तरावरून ३० आॅक्टोबरपर्यंत टीईटी परीक्षेचे सर्व उमेदवारांचे अर्ज शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करण्यात येणार आहेत.
शिक्षक पात्रता परीक्षा दोन गटात घेतली जाणार आहे. पहिला पेपर हा बहुपर्यायी १५० गुणांचा राहणार आहे. यामध्ये बाल मानसशास्त्र अध्यापनासाठी ३० गुण, भाषाविषय १ आणि २ साठी देखील ३० गुण, गणित ३० गुण, परिसर अभ्यासासाठी ३० गुण ठेवण्यात आले आहे. दुसरा पेपर हा उच्च प्राथमिकसाठी १५० गुणांचा राहणार आहे. यात भाषा १, २, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, गणित, सामाजिकशास्त्र आदी विषय राहणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: The teacher's eligibility exam was a downpour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.