शिक्षणात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे योगदान
By Admin | Updated: January 17, 2015 22:58 IST2015-01-17T22:58:53+5:302015-01-17T22:58:53+5:30
विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहील, यापुढे कोणताही निर्णय घेताना

शिक्षणात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे योगदान
गडचिरोली : विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहील, यापुढे कोणताही निर्णय घेताना शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची सरकार खबरदारी घेईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांच्या महामंडळाच्यावतीने राज्यस्तरीय अधिवेशन व चर्चासत्राचे आयोजन गडचिरोली येथील विद्याभारती कन्या हायस्कूलमध्ये करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते १७ जानेवारी रोजी करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. शोभाताई फडणवीस तर प्रमुख अतिथी म्हणून आ. ना. गो. गाणार, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, नगराध्यक्षा निर्मला मडके, सुरेश पोरेड्डीवार, अनिल म्हशाखेत्री, स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य राजू मुनघाटे, किशोर वनमाळी, सुधीर भातकुलकर, प्राचार्य संजय नार्लावार, प्राचार्य मनिष शेटे, सुनील चडगुलवार, सुखदेव कंद, मंडळाचे सहकार्यवाह शिवाजी खांडेकर, वाल्मिकी सुराशे, मनोज पराते, अविनाश चडगुलवार, प्रीती भोसले, शोभा तांबे, लिलादास जसुजा, प्रमोद पाटील, बाबासाहेब पाटील, तानाजी माने, प्रमोद पिपरे आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिवेशनादरम्यान ‘विदर्भ मातीचे’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अधिवेशनाला ३४ जिल्ह्यातील हजारो शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना अम्ब्रीशराव आत्राम यांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे प्रयत्न करू, सरकार नवीन आहे. त्यामुळे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी थोडा धीर धरावा.
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय होईल, असा कोणताच निर्णय शासन कधीच घेणार नाही. यापूर्वीचे सरकार दिलेले आश्वासन कधीच पाळत नव्हते. त्यामुळे नागरिकांचा सरकारवर विश्वास राहला नव्हता. मात्र सध्याच्या सरकारमधील मंत्री जे बोलतात. ते करून दाखवितात, असे मार्गदर्शन केले.
अधिवेशनाच्या प्रास्ताविकदरम्यान मंडळाचे सहकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसमोर असलेल्या समस्या मान्यवरांच्या लक्षात आणून दिल्या. २३ आॅक्टोबर २०१३ चा अन्यायकारक निर्णय रद्द करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकेत्तर महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई येथे १६ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत दिले असून हे आश्वासन मंत्र्यांनी पाळावे, असे आवाहन मान्यवरांना केले. संचालन प्रा. नरेंद्र आरेकर यांनी केले.