धानोरा : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोसमी नंबर १ च्या प्रभारी केंद्रप्रमुखांनी बाहेर तालुक्यात बदली करण्याची धमकी देऊन १२ हजार रूपये लुबाडले असल्याचा आरोप कोसमी नंबर १ येथील शिक्षक मनकुराम धुर्वे यांनी केला आहे. यासंबंधी प्रभारी केंद्रप्रमुखावर कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी धुर्वे यांनी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.कोसमी केंद्र शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असून या शाळेत १५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्य:स्थितीत शाळेत पाच शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षक मनकुराम धुर्वे यांनी म्हटले आहे की, मी अतिरिक्त नसतांनाही प्रभारी केंद्रप्रमुखांनी तुझी बदली भामरागड, मुलचेरा, सिरोंचा या तीन तालुक्यात होणार असून बदली रद्द करायची असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना १५ हजार रूपये द्यावे लागेल, असे सांगून गटसाधन केंद्र धानोरा येथे २२ मे रोजी १२ हजार रूपये घेतले. उर्वरित ३ हजार रूपये प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्याला देण्यासाठी पैशाची मागणी करून मानसिक छळ केला, असा आरोप धुर्वे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे. कोसमी केंद्र शाळेत मागील वर्षी संबंधीत केंद्रप्रमुखाची नियमबाह्य बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखाचा प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे कोसमी केंद्रात प्रभारी केंद्रप्रमुखाची दहशत पसरली आहे. धानोरा येथे बैठक आहे, असे सांगून शाळेत गैरहजर राहणे, अध्यापन न करणे, थकबाकी काढून देण्यासाठी शिक्षकांकडून पैसे मागणे, असे प्रकार प्रभारी केंद्रप्रमुख करीत असल्याचा आरोप धुर्वे यांनी दिलेल्या तक्रारीतून केला आहे. त्यामुळे प्रभारी केंद्रप्रमुखाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व न्याय द्यावा, अशी मागणी शिक्षक मनकुराम धुर्वे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
शिक्षकाकडून १२ हजार लुबाडले
By admin | Updated: August 25, 2014 23:59 IST