शिक्षकांची पाठ
By Admin | Updated: September 1, 2014 23:33 IST2014-09-01T23:33:51+5:302014-09-01T23:33:51+5:30
शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी राज्य शासनाकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तर जिल्हा परिषदेमार्फत जिल्हास्तरीय आदर्श दिला जातो.

शिक्षकांची पाठ
अनास्था : जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी ११ प्रस्ताव
गडचिरोली : शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी राज्य शासनाकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तर जिल्हा परिषदेमार्फत जिल्हास्तरीय आदर्श दिला जातो. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राथमिक शिक्षकांचे पुरस्कारांसाठी केवळ ११ प्रस्ताव दाखल झाले आहेत. फारच कमी प्रस्ताव दाखल झाल्याने आदर्श शिक्षक पुरस्काराप्रती शिक्षकांमध्ये अनास्था असल्याचे दिसून येते. या पुरस्काराकडे अनेक लायक व पात्र शिक्षकांनी पाठ फिरविली असल्याचे दिसून येते.
भारताचे दुसरे राष्ट्रपती थोर शिक्षण तज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर रोजी सर्वत्र शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच दिवशी शिक्षक दिनी शासन व प्रशासनाकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षकांच्या कार्यांचा गौरव केला जातो.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी इच्छुक शिक्षकांकडून १५ जुलैपासून १ सप्टेंबरपर्यंत सर्व आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव मागविण्यात आले. आज १ सप्टेंबरच्या तारखेत अखेरच्या दिवशी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राथमिक शिक्षकांचे केवळ ११ प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आले आहे. माध्यमिक शिक्षकांकडून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एकही प्रस्ताव अद्यापर्यंत शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पाच वर्षाच्या शिक्षक सेवेचा गोपनिय अहवाल, सलग १५ वर्षाची सेवा, मुख्याध्यापकांसाठी सलग २० वर्षाची सेवा व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे चारित्र्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
वेतनवाढ व आर्थिक लाभाच्या अभावामुळे प्रस्ताव कमी
खूप वर्षापूर्वी राज्य शासनाकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तसेच जिल्हा परिषदेकडून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगावू वेतनवाढ देण्यात येत होती. मात्र सदर वेतनवाढ बंद करण्यात आल्याने या पुरस्कारासाठी सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावामध्ये घट झाली आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षकांना रोख स्वरूपात कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ देण्यात येत नाही. यामुळे बहुतांश शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करीत नसल्याचे दिसून येते. याशिवाय पुरस्कारासाठी इच्छुक शिक्षकांनाच स्वत: प्रस्ताव दाखल करावा लागतो.