"टप गेला वरी, आमची लाल परी"; ST बसचा व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 11:02 IST2023-07-27T10:48:15+5:302023-07-27T11:02:33+5:30
राज्य सरकारने नुकतेच महिला भगिनींसाठी बस दरात ५० टक्के सवलत दिली आहे

"टप गेला वरी, आमची लाल परी"; ST बसचा व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स संतप्त
राज्य परिवहन महामंडळासाठी राज्य सरकार तब्बल ५ हजार नवीन बसेस खरेदी करणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच माध्यमांत झळकली होती. त्या बस येतील तेव्हा येतील, पण महामंडळाच्या सध्याच्या बसची दुर्दशा पाहून प्रवाशांकडून सातत्याने संताप व्यक्त करण्यात येतो. कुठे बसला काचा नाहीत, कुठे सीटच नाही, कुठे सीट अर्धे फाटलेले असते, तर कुठे रस्त्यावरुन धावताना गाडीचा खडखडाट संगीतमय भासतो. त्यामुळे, प्रवाशी वर्गाकडून बसची अवस्था पाहून राग व्यक्त केला जातो. त्यातच, आता महामंडळाच्या बसचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.
राज्य सरकारने नुकतेच महिला भगिनींसाठी बस दरात ५० टक्के सवलत दिली आहे. ज्या बसमधून या महिला प्रवास करतात, त्या बसची काय दुर्दशा करुन ठेवलीय हेही पाहायला हवे. मात्र, सरकारचे आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष असते. अशाच एका बसचा व्हिडिओ आता सोशल मीडियातून समोर आला आहे. त्यामध्ये, बसचे टप उडाल्याचे दिसून येते. काहींनी या बसचा व्हिडिओ शेअर करत महामंडळ आणि सरकारची खिल्ली उडवलीय. तर, काहींना गांभीर्याने याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ गडचिरोली जिल्ह्यातील बसचा असल्याची माहिती आहे. मात्र, टप अर्धा उडालेला असतानाही ड्रायव्हर मोठ्या हिमतीने ही बस पुढे नेत आहेत. सुदैवाने ज्या रस्त्यावरुन ही बस धावताना दिसते, तो रस्ता चांगला आहे. अन्यथा बसमधील प्रवाशी आणि चालक-वाहकांचे काय हाल झाले असते, हे न विचारलेलेच बरे. दरम्यान, गडचिरोलीत बस हे उदाहरण ठरेल, पण महामंडळाच्या राज्यातील अनेक बस डेपोतील बस गाड्यांची दुर्दशा अशीच झाली आहे. त्यामुळे, सरकार याकडे गांभीर्याने पाहणार का, हाच खरा प्रश्न आहे.