जंगलातील पाणवठ्यात टँकरने पाणी पुरवठा
By Admin | Updated: April 8, 2015 01:10 IST2015-04-08T01:10:45+5:302015-04-08T01:10:45+5:30
दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत असल्याने सर्वत्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे.

जंगलातील पाणवठ्यात टँकरने पाणी पुरवठा
चामोर्शी : दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत असल्याने सर्वत्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. त्यातच भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे वन विभागाने निर्माण केलेल्या जंगलातील पाणवठे कोरडे पडले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची गावाकडे भटकंती सुरू आहे. यावर उपाययोजना म्हणून चामोर्शी वन परिक्षेत्र कार्यालयाने जंगलातील २३ कृत्रिम पाणवठ्यात वन विभागाच्या टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा उपक्रम गेल्या काही दिवसांपासून हाती घेतला आहे.
चामोर्शी वन परिक्षेत्रांतर्गत २० नियत क्षेत्र असून यामध्ये ८० गावांचा समावेश आहे. या वन परिक्षेत्रातील जंगलाचे व वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी एक वन परिक्षेत्राधिकारी, तीन क्षेत्र सहायक, २९ वनरक्षक, आठ वनमजूर कार्यरत आहेत. यंदा भरपूर पाऊस होऊनही एप्रिल महिन्यापासून बहुतांश भागात पाणीटंचाई समस्या निर्माण झाली आहे. अनेक गावानजीक तसेच जंगल परिसरातील तलाव, बोडी, नाले, कोरडे पडत असल्याने वन्यप्राणी व गावातील जनावरांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जंगल परिसरात असलेले पाण्याचे स्त्रोत उन्हाच्या दाहकतेमुळे पूर्णत: कोरडे पडले आहे. परिणामी पाण्याच्या शोधात वन्यप्राणी व जनावरे गावाकडे धाव घेतात. यामुळे शिकारीचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी वन्यप्राण्यांना जंगल परिसरात पाण्याची सुविधा व्हावी, याकरिता चामोर्शी वन परिक्षेत्र कार्यालयामार्फत चामोर्शी उपक्षेत्रातील सोनापूर अड्याळ, वाकडी, भिक्षी, हळदी, विसापूर, तसेच जामगिरी उपक्षेत्रात जामगिरी, गहूबोडी, नारायणपूर, राजगोपालपूर तसेच भाडभिडी उपक्षेत्रात कर्कापल्ली व हळदवाही गावानजीकच्या जंगल परिसरात वन विभागाच्या वतीने २३ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले असून या पाणवठ्यामध्ये टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. या उपक्रमासाठी चामोर्शीचे वन परिक्षेत्राधिकारी शंकर गाजलवार, क्षेत्र सहायक संजय पेंपकवार, आर. के. जल्लेवार, शंकर गुरनुले यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक व वनमजूर जंगलातील पाणवठ्यांस पाणी पुरवठा करण्याचे काम करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)