तंमुसचे काम ढेपाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:35 IST2021-04-15T04:35:04+5:302021-04-15T04:35:04+5:30
गडचिरोली : गावात क्षुल्लक कारणावरून तंटे निर्माण होऊ नये, झालेच तर ते गावपातळीवरच मिटवून गावात शांतता, व्यसनमुक्ती व्हावी, ...

तंमुसचे काम ढेपाळले
गडचिरोली : गावात क्षुल्लक कारणावरून तंटे निर्माण होऊ नये, झालेच तर ते गावपातळीवरच मिटवून गावात शांतता, व्यसनमुक्ती व्हावी, यासाठी तंमुसची स्थापना करण्यात आली. तंमुसचा कारभार चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी सदस्यांना प्रशिक्षण द्यावे.
जननी सुरक्षा कुचकामी
आलापल्ली : शासनाच्या वतीने जननी शिशल सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही.
ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ
देसाईगंज : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे, मात्र याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र वीजचोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागताे.
पांढरे पट्टेविरहित दिसतात गतिरोधक
आष्टी : वाहनचालकांना रस्त्यावरील गतिरोधक दिसावे, यासाठी गतिरोधकावर पांढरे पट्टे मारले जातात. मात्र बहुतांश गतिरोधकांवर पट्टे दिसत नाही. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. अनेक अवजड वाहनधारक वेगाने जातात.
शिवमंदिर जीर्णावस्थेत
गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिवमंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंती आहे. अमिर्झापासून चार किमी अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सदर मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. सदर मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते.
शाळांची दुरुस्ती करा
सिरोंचा : तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक शाळांच्या इमारतींना ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. या शाळांच्या इमारती जीर्णावस्थेत पोहोचल्या आहेत. या इमारतींचे निर्लेखन करून नवीन इमारत बांधण्याची मागणी आहे. सिराेंचा तालुक्याच्या दुर्गम भागात शाळांच्या इमारती खराब आहेत.
नाल्यांचा उपसा करा
गडचिरोली : आरमोरी मार्गावरील नाल्यामागील अनेक दिवसांपासून उपसण्यात आल्या नाही. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. या मार्गावर व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर कचरा नाल्यांमध्ये फेकत असतात. त्यामुळे नाल्या लवकरच तुंबतात. कारवाई करण्याची मागणी होत आहे.
स्वच्छतागृहाचा अभाव
धानोरा : चातगाव येथील बसथांब्यावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने त्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चातगाव बसस्थांब्यावर स्वच्छतागृहाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे. चातगाव हे धानाेरा मार्गावर असून, येथे शेकडाे नागरिक दरराेज आवागमन करीत असतात.
फवारणीचा अभाव
कुरखेडा : रामगड- पुराडा भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या भागात तत्काळ डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यंदाच्या पावसाळ्यातही फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागले.
पुलाची उंची वाढवा
धानोरा : तालुक्यातील कारवाफा नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत अनेकदा सदर मार्ग बंद राहत असल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
निवाऱ्यांची दुरवस्था
गडचिरोली : येथून आरमोरीकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या मोहझरी, वसा, देऊळगाव येथील प्रवासी निवाऱ्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करताना त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी निश्चित करावी.
सौरदिवे धूळ खात
गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये सौरदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र या सौरदिव्यांची देखभाल व दुरुस्ती केली जात नसल्याने ९० टक्के सौरदिवे बंद पडले आहेत. त्यामुळे विद्युतपुरवठा खंडित होताच गावात अंधाराचे साम्राज्य पसरते.
सेविकांची पदे रिक्त
गडचिरोली : जिल्ह्यात ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३६ आरोग्य पथक व ३७६ उपकेंद्रे आहेत. या सर्व ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आरोग्य सेवा देण्याचे काम परिचारिका करते, मात्र जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत परिचारिकांचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात दरहजारी परिचारिकांचे प्रमाण ५.३१ टक्के आहे.
विश्रामगृह प्रलंबितच
कोरची : येथे शासकीय विश्रामगृह आवश्यक आहे. तशी नागरिकांकडून अनेकदा मागणी करण्यात आली. ही विश्रामगृहाची मागणी अद्यापही प्रलंबितच आहे. कोरची हे जिल्ह्याचे शेवटचे ठिकाण आहे. या ठिकाणी विश्रामगृह बांधल्यास या ठिकाणी येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी सोयीचे होणार आहे.
नूतनीकरणाची प्रतीक्षा
अहेरी : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आलापल्ली-भामरागड मार्गावरील चंद्रा-ताडगावपर्यंतच्या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम संबंधित कंत्राटदाराकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आले; मात्र अल्पावधीतच रस्ता उखडला असल्याची ओरड परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे.