शासकीय विविध योजनांचा लाभ घ्या
By Admin | Updated: September 26, 2015 01:36 IST2015-09-26T01:36:47+5:302015-09-26T01:36:47+5:30
दुर्गम गावातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे तसेच विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत ...

शासकीय विविध योजनांचा लाभ घ्या
मंजेगाव, राजाराम येथे कार्यक्रम : पोलीस मदत केंद्रांचा पुढाकार; विविध विभागांची दिली माहिती; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गडचिरोली : दुर्गम गावातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे तसेच विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पोलीस विभागामार्फत जनजागरण मेळावे घेतले जात आहेत. याच धर्तीवर चामोर्शी तालुक्यातील घोट पोलीस मदत केंद्रांतर्गत मंजेगाव येथे जनजागरण मेळावा व अहेरी तालुक्यातील राजाराम गणेश उत्सवानिमित्त प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला व योजनांची माहिती देण्यात आली.
घोट पोलीस मदत केंद्रांतर्गत मंजेगाव येथे जनजागरण मेळावा घेण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पनाळे होते. प्रमुख अतिथी म्हणून मंडळ अधिकारी सरपे, चापलवाडाचे सरपंच रमेश मेकलवार, घोटचे सरपंच बाळा येनगंटीवार, अशोक पोरेड्डीवार, पोलीस पाटील हरिदास चलाख, तंमुस अध्यक्ष विठ्ठल बोमकंटीवार, रमेश दुधबावरे, मनोहर गेडाम, गंगाधर रामटेके, कक्ष अधिकारी कागदेलवार, पीएसआय पवार, इंगळे, बांगर, कदम, नाईक उपस्थित होते.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी महसूल विभागाच्या वतीने सातबारा, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, जन्ममृत्यू नोंद आदींविषयी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन बांगर तर आभार कदम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोल्हे, डोंगरे, मानकर, दुर्गे, पाल, बोरकर यांनी सहकार्य केले.
अहेरी तालुक्यातील राजाराम पोलीस ठाण्याच्या वतीने गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या निमित्ताने समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रभारी अधिकारी सुदाम शिरसाट उपस्थित होते.
गावात सर्व जाती, धर्माचे लोक वास्तव्य करीत असतात. उत्सवकाळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन सुदाम शिरसाट यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन कदम तर आभार लावण्या यांनी मानले. यावेळी पोलीस हजर होते. (शहर प्रतिनिधी)