३१ अन्नपदार्थ विक्रेत्यांचे परवाने निलंबित
By Admin | Updated: November 20, 2015 01:43 IST2015-11-20T01:43:46+5:302015-11-20T01:43:46+5:30
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत अन्न पदार्थ विकणाऱ्या शेकडो दुकानांची चौकशी करण्यात आली.

३१ अन्नपदार्थ विक्रेत्यांचे परवाने निलंबित
शेकडो दुकानांची तपासणी : अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
गडचिरोली : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत अन्न पदार्थ विकणाऱ्या शेकडो दुकानांची चौकशी करण्यात आली. यापैकी ३१ दुकानांमध्ये अन्न पदार्थ विक्री कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
अन्न पदार्थ विकणाऱ्या व त्यांची निर्मिती करणाऱ्या दुकान संस्थांवर नियंत्रण राहावे यासाठी प्रत्येक दुकानदाराला व संस्थेला अन्न व औषध प्रशासन विभागाकडून परवाना घ्यावा लागतो. ज्या दुकानाची वार्षिक उलाढाल १२ लाखांच्या वर आहे. अशा दुकानांना परवाना वितरित केला जातो. अशा प्रकारचे गडचिरोली जिल्ह्यात ७६२ परवानाधारक आहेत. तर ज्या दुकानाची वार्षिक उलाढाल १२ लाखांच्या खाली आहे. त्यांच्या दुाकनांची नोंदणी केली जाऊन त्याबाबतचे प्रमाणपत्र त्यांना दिले जाते. सदर प्रमाणपत्र दुकानावर लावणे गरजेचे आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ७ हजार ४२६ नोंदणीधारक दुकानदार आहेत.
परवाना व नोंदणीच्या माध्यमातून प्रत्येक दुकानावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे नियंत्रण राहते. अन्न निरिक्षकांच्या वतीने या दुकानांची नियमितपणे तपासणी केली जाते. तपासणीदरम्यान ज्या अन्न पदार्थांची विक्री केली जात आहे. ते अन्न पदार्थ खाण्यास योग्य आहेत काय हे पडताळून बघितले जाते. एखाद्या नमुन्याबाबत संशय आढळल्यास सदर नमुना तपासणीसाठी विभागस्तरावरील प्रयोगशाळेतही पाठविण्यात येते. त्याचबरोबर अन्न पदार्थ विक्रीच्या कायद्यामध्ये ज्या ठिकाणी अन्न पदार्थ विकले जात आहेत त्या ठिकाणी योग्य स्वच्छता आहे काय? यासारख्या अनेक बाबींची पाहणी करण्यात येते.
१ एप्रिल ते १७ आॅक्टोबर या कालावधीत अन्न प्रशासन विभागाच्या वतीने शेकडो दुकानांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये ३१ दुकानांमध्ये अन्न पदार्थ विक्रीसंदर्भात असलेल्या कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कारवाईमुळे संबंधित दुकानदाराबरोबरच इतरही दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते व सदर दुकानदार अन्न पदार्थ खाण्यायोग्य ठेवून स्वच्छता पाडण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)