सूर्यडोंगरीची दारू पाच गावांची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:27 IST2018-10-06T01:27:16+5:302018-10-06T01:27:36+5:30
तालुक्यातील किटाळी, इंजेवारी, पेठतुकूम व देलोडा बुज येथे मुक्तिपथ संघटनेच्या सहकार्याने गाव संघटना गठित करून दारूबंदी करण्यात आली. ही दारूबंदी यशस्वीही झाली. मात्र शेजारच्या सूर्यडोंगरी येथे दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने याचा त्रास लगतच्या गावातील नागरिकांना होत आहे.

सूर्यडोंगरीची दारू पाच गावांची डोकेदुखी
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील किटाळी, इंजेवारी, पेठतुकूम व देलोडा बुज येथे मुक्तिपथ संघटनेच्या सहकार्याने गाव संघटना गठित करून दारूबंदी करण्यात आली. ही दारूबंदी यशस्वीही झाली. मात्र शेजारच्या सूर्यडोंगरी येथे दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने याचा त्रास लगतच्या गावातील नागरिकांना होत आहे. त्यामुळे सूर्यडोंगरी गावातील दारूविक्री पूर्णत: बंद करण्याचा निर्धार पाच गावांतील नागरिकांनी केला.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीला प्रामुख्याने मुक्तिपथचे संघटक नीलम हरिणखेडे, प्रेरक भूमिका उरकुडे, देऊळगावचे उपसरपंच कवडू सहारे, पोलीस पाटील नरेंद्र बनकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वासुदेव राऊत, व्यसनमुक्ती समितीचे अध्यक्ष नितीन मोटघरे, इंजेवारीचे उपसरपंच अतुल आकरे आदी उपस्थित होते.
सूर्यडोंगरी गावात दारूचा महापूर असून येथे ८० टक्के कुटुंब दारूविक्री करीत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची व मद्यपींची सूर्यडोंगरी गावात दररोज दारू पिण्यासाठी गर्दी होत आहे. सूर्यडोंगरीलगत असलेल्या किटाळी, देलोडा बुज, इंजेवारी, पेठतुकूम या गावातील महिलांना सूर्यडोंगरीतील दारूविक्रीचा त्रास होत आहे. त्यामुळे चार गावातील गाव संघटना व नागरिकांची विशेष संयुक्त बैठक देऊळगाव येथे पार पडली. पोलीस विभागाकडे दारू विक्रीबाबतची तक्रार करूनही कारवाई झाली नाही. सूर्यडोंगरी गावातील दारूविक्रेत्यांना दारू बंद करण्याची मुक्तिपथ गाव संघटनेमार्फत नोटीस बजाविण्यात आली. मात्र याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे चार गावांतील नागरिकांची संयुक्त बैठक बोलावून येथे १०० टक्के दारूबंदी करण्याचा संकल्प नागरिकांनी केला.
उपविभागीय पोलीस अधिकाºयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. पोलीस विभाग व पोलीस पाटील यांच्या सहकार्याने सूर्यडोंगरी गावातील दारूला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असा एकमुखी निर्णय चार गावातील संयुक्त बैठकीत घेण्यात आला.