आठ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षली दांपत्याचे आत्मसमर्पण; विविध गुन्हे आहेत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 18:13 IST2021-07-30T18:13:45+5:302021-07-30T18:13:57+5:30
कोरची व टिपागड दलममध्ये होते कार्यरत

आठ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षली दांपत्याचे आत्मसमर्पण; विविध गुन्हे आहेत दाखल
गडचिरोली : नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू असताना त्यांना हादरा देत एका नक्षली दांपत्याने शुक्रवारी (दि.३०) चळवळ सोडून पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. या दांपत्यापैकी पतीवर ६ लाखांचे, तर पत्नीवर दोन लाखांचे बक्षीस शासनाने ठेवले होते. यावर्षी (२०२१) आतापर्यंत सहा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
विनोद उर्फ मनीराम नरसू बोगा (३२ वर्ष, रा. बोटेझरी, ता. कोरची, जि. गडचिरोली) आणि कविता उर्फ सत्तो हरिसिंग कोवाची (३३ वर्ष, रा.गौडपाल, जिल्हा राजनांदगाव (छत्तीसगड) अशी या दांपत्याची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले, नक्षल चळवळीत असतानाच या दोघांनी विवाह केला. विनोद हा कोरची दलममध्ये एसीएम (एरिया कमिटी मेंबर) म्हणून, तर कविता ही पार्टी मेंबर म्हणून टिपागड दलममध्ये कार्यरत होती. त्यांच्या आत्मसमर्पणासाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
जिल्हा पोलीस दलाने नक्षलविरोधी अभियान प्रभावीपणे राबविल्यामुळे २०१९ ते २०२१ या अडीच वर्षांत ४३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामध्ये ४ डीव्हीसी, २ दलम कमांडर, ३ उपकमांडर अशा वरिष्ठ कॅडरसह ३३ सदस्य आणि १ जनमिलीशियाचा समावेश आहे. पत्र परिषदेला अपर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया (अभियान), समीर शेख (प्रशासन) सोमय मुंडे (अहेरी उपमुख्यालय) आणि एसडीपीओ भाऊसाहेब ढोले (अभियान) उपस्थित होते.
विनोद बोगावर खुनाचे १३ गुन्हे
आत्मसमर्पित नक्षली विनोद बोगा याच्यावर खुनाचे १३ गुन्हे, चकमकीचे २१, जाळपोळीचा एक आणि इतर ५ गुन्हे दाखल आहेत. कवितावर चकमकीचे ५, जाळपोळीचा १ आणि इतर ३ गुन्हे दाखल आहेत. शासनाच्या योजनेनुसार नक्षली पती-पत्नीने एकाचवेळी आत्मसमर्पण केल्यास त्यांना दीड लाख रुपये अतिरिक्त लाभ दिला जातो. तो लाभ या दांपत्याला मिळेल.