लोकबिरादरीत २५० रूग्णांवर शस्त्रक्रिया
By Admin | Updated: March 26, 2016 01:06 IST2016-03-26T01:06:00+5:302016-03-26T01:06:00+5:30
येथील लोकबिरादरी रूग्णालयाच्या वतीने विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या सुमारे अडीचशेपेक्षा अधिक रूग्णांवर ....

लोकबिरादरीत २५० रूग्णांवर शस्त्रक्रिया
तीन शिबिरांचे आयोजन : रूग्णांना मिळाले जीवदान
भामरागड : येथील लोकबिरादरी रूग्णालयाच्या वतीने विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या सुमारे अडीचशेपेक्षा अधिक रूग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना नवजीवन प्राप्त करून दिले आहे. लोकबिरादरी रूग्णालयाच्या या कार्याची रूग्णांनी प्रशंसा केली असून या रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
सर्वसामान्य व गरीब नागरिकांना विविध आजारांच्या असलेल्या शस्त्रक्रिया खासगी रूग्णालयांमध्ये करणे आर्थिक परिस्थितीमुळे शक्य होत नाही. गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात जरी मोफत शस्त्रक्रिया होत असली तरी गडचिरोलीसारख्या शहराच्या ठिकाणी येण्यास भामरागड, एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम भागातील आदिवासी रूग्ण तयार होत नाही. हे रूग्ण लोकबिरादरी प्रकल्पातच उपचार घेण्यास अधिक पसंती दर्शवितात. मागील तीन महिन्यांत छत्तीसगड, तेलंगणा राज्य व गडचिरोली जिल्ह्यातील हजारो रूग्णांनी विविध रोगांचा उपचार घेतला. ज्या रूग्णांना शस्त्रक्रियेची गरज होती. अशा अडीचशे पेक्षा अधिक रूग्णांवर शस्त्रक्रियासुध्दा करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर आवश्यक असलेली औषधेसुध्दा या रूग्णालयाच्या वतीने मोफत उपलब्ध करून दिल्याने गरीब रूग्णांसाठी सदर रूग्णालय महत्त्वाचे ठरले आहे.
मागील आठवड्यात पाच पेक्षा अधिक रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तीन महिन्यांत तीन शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले. शिबिरादरम्यान समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे यांच्यासह यवतमाळ व नागपूर येथून आलेल्या तज्ज्ञांनी शस्त्रक्रिया पार पाडल्या. शस्त्रक्रियेनंतर रूग्णांची सेवा करण्याचे काम सिस्टर व वॉर्डबाय करतात. संध्या येप्पलवार, जगदिश बुरडकर, बबन पांचाळ, शारदा ओक्सा, गणेश हिवरकर, अरविंद मडावी, सुरेंद्र सडमेक, रमिला वाचामी, कौशल्या नैताम, ममिता झाडे, सविता मडावी, पार्वती वड्डे, लक्ष्मी ओक्सा, शंकर गोटा, प्रदीप वाघ, प्रकाश महाळकर, डॉ. मिनल मून हे कर्मचारी सुध्दा सहकार्य लाभले. (तालुका प्रतिनिधी)