निलगाय व माकडाच्या हल्ल्यात जखमी झाल्यास अर्थसहाय्य; शासनाची नव्याने तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 19:18 IST2020-02-16T19:17:56+5:302020-02-16T19:18:09+5:30
गडचिरोली : वन्यजीवांनी हल्ला केल्यास वन विभागामार्फत जखमी व्यक्तीला अर्थसहाय्य दिले जाते. यामध्ये आता रोही (निलगाय) व माकड (वानर) ...

निलगाय व माकडाच्या हल्ल्यात जखमी झाल्यास अर्थसहाय्य; शासनाची नव्याने तरतूद
गडचिरोली : वन्यजीवांनी हल्ला केल्यास वन विभागामार्फत जखमी व्यक्तीला अर्थसहाय्य दिले जाते. यामध्ये आता रोही (निलगाय) व माकड (वानर) यांचा समावेश करण्यात आला असून या दोन वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमींना अर्थसहाय्य देण्याची तरतूद शासनाने केली आहे.
वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तडस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे या वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत पावल्यास आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद आधीच होती. या वन्यजीवांसोबतच निलगाय व माकडाच्या हल्ल्यात जखमी होण्याच्या घटनाही घडत आहेत.
शासन निर्णयात तरतूद नसल्याने माकड किंवा निलगायीने हल्ला करून जखमी केले तरी मदत मिळत नव्हती. या जखमींनाही मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यानुसार महसूल व वन विभागाने शासन निर्णय काढला आहे.
त्यानुसार व्यक्ती मृत झाल्यास १५ लाख रुपये, गाय, म्हैस, बैल यांचा मृत्यू झाल्यास बाजारभाव किमतीच्या ७५ टक्के किंवा ६० हजार रुपये यापैकी कमी असणारी किंमत दिली जाईल. तसेच जखमी असलेल्या व्यक्तीलाही आवश्यक ती मदत दिली जाणार आहे.