पुरवठा विभाग : तहसीलच्या लेटलतीफ कर्मचाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त
By Admin | Updated: January 23, 2015 02:24 IST2015-01-23T02:24:24+5:302015-01-23T02:24:24+5:30
तहसील कार्यालयामध्ये वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याचा गैरफायदा कर्मचाऱ्यांनी घेणे सुरू केले असून गुरूवारी सकाळी १०.३० वाजता प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता,...

पुरवठा विभाग : तहसीलच्या लेटलतीफ कर्मचाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त
गडचिरोली : तहसील कार्यालयामध्ये वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याचा गैरफायदा कर्मचाऱ्यांनी घेणे सुरू केले असून गुरूवारी सकाळी १०.३० वाजता प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता, तहसील कार्यालयामधील पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षकांसह कोणताही कर्मचारी उपस्थित नव्हता. नागरिक मात्र या कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत बाहेर ताटकळत उभे होते.
शासनाच्या अर्ध्यापेक्षा अधिक योजना तहसील कार्यालयाच्या मार्फतीने राबविल्या जातात. त्यामुळे तहसील कार्यालयात नेहमीच शेकडो नागरिक कामासाठी येतात. त्यातही पुरवठा विभागाच्या वतीने नागरिकांना स्वस्त दरात अन्नधान्य, केरोसीनचा पुरवठा केला जातो. या कार्यालयामार्फत नवीन रेशनकार्ड तयार करणे, रेशनकार्डावर नाव दाखल करणे, रेशनकार्डवरून नाव कमी करणे व त्याची पावती घेणे आदी कामे केली जातात. ही कामे वर्षभर चालत असून गरीब नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची कामे आहेत. त्यामुळे या कार्यालयात दररोज नागरिकांची गर्दी असते.
गडचिरोली येथील पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षकांसह जवळपास पाच ते सहा कर्मचारी आहेत. मात्र हे कर्मचारी सकाळी ११ वाजताशिवाय कार्यालयात पोहोचत नाहीत. परिणामी ४० किमी अंतरावरून आलेल्या नागरिकांना येथील कर्मचाऱ्यांची वाट बघत रहावी लागते. गुरूवारी सकाळी १०.३० वाजूनही कोणताही कर्मचारी कार्यालयामध्ये पोहोचला नाही. शासकीय कामासाठी आलेले नागरिक कार्यालयामध्ये डोकावून पाहत होते. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सर्वच खुर्च्या रिकाम्या पाहून ते अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या नावाने बोटे मोडत तहसील कार्यालयाबाहेर जात होते.
तहसील कार्यालयामधील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची उशिरा उपस्थित राहण्याच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. सकाळी १० वाजताची कार्यालयीन वेळ आहे. मात्र १०.३० वाजूनही एकही कर्मचारी या कार्यालयात उपस्थित नव्हता. इतर विभागांचीसुद्धा स्थिती यापेक्षा वेगळी नाही. विशेष म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याची हजेरी तहसीलदारांच्या टेबलवर ठेवण्यात आली आहे. मात्र कार्यालयात येण्याच्या वेळेची निश्चित नोंद केली जात नसल्याने दिवसेंदिवस उशिरा येतात. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. (नगर प्रतिनिधी)